अपघात होण्याची दाट शक्यता
। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान शहरातील सांडपाण्याचे व्यवस्थापन कारण्यासाठी ई मलनिसारण प्रकल्प उभारला जात आहे. सध्या हॉटेल लाईनवर चेंबर बनविण्याची कामे सुरु असून नव्याने बनविलेल्या चेबंरला होल पडले आहेत. त्यामुळे त्यात घोड्यांचा पाय अडकून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाबद्दल शंका उपस्थित होत आहेत.
माथेरानमधील सांडपाणी शहरातून दरीमध्ये जाऊ नये यासाठी राज्य मानवी हक्क आयोगाच्या आदेशाने महाराष्ट्र शासनाने सांडपाणी प्रकल्प मंजूर केला आहे. त्या प्रकल्पाच्या कामाबद्दल माथेरानमधील नागरिक नाराज आहेत. स्थानिकांची नाराजी लक्षात घेऊन माथेरान नगरपरिषदेकडून सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे काम काही दिवस थांबवून ठेवण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा या प्रकल्पाचे काम सुरु झाल्यानंतर देखील ठेकेदार कंपनीकडून पुन्हा एकदा स्थानिकांची नाराजी ओढवून घेत आहे.
सध्या शहरातील हॉटेल लाईन भागात कामे सुरु आहेत. त्या भागातील एका हॉटेल समोरील रस्त्यावर बसविण्यात आलेले सिमेंट चेंबर फुटली आहेत. त्या भागातून माल वाहतूक करणारे घोडे तसेच पर्यटक यांची ये-जा सुरु असते. तसेच, या भागातील रस्त्यावर पूर्णपणे विजेचे दिवे देखील नाहीत. त्यामुळे त्या फुटलेल्या चेंबरमध्ये पर्यटक आणि घोड्यांचा पाय अडकून अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत पर्यटकांची वाहतूक करणारे अश्वपालक यांनी नाराजी व्यक्त केली असून पालिकेने तात्काळ चेंबर दुरुस्ती करून घेण्यात यावेत, अशी मागणी स्थानीकांकडून करण्यात येत आहे.