| नागोठणे | वार्ताहर |
नागोठण्यातील मराठा आळी येथील ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ तसेच श्री कानिफनाथ मित्र मंडळ, नागोठणे यांच्या वतीने मराठा आळीतील श्री कानिफनाथ मंदिरात दरवर्षी प्रमाणे यावर्षी सोमवारी (दि. 9) आयोजित केलेला श्री कानिफनाथ महाराजांचा होळी पंचमी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
मराठा आळीतील श्री कानिफनाथ महाराजांच्या मंदिरात या होळी पंचमी उत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सकाळी 7 वा. दुग्धाभिषेकाने या धार्मिक सोहळ्याची सुरुवात श्री कानिफनाथ महाराजांच्या भक्त गणांकडून करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी 5 वा. मराठा आळी ग्रामस्थांकडून ध्वजारोहन करण्यात आले. नंतर सायंकाळी 6 वा. ग्रामस्थ मंडळ, मराठा आळी, के.एम.जी. विभाग व नागोठणे पंचक्रोशीतील भक्तगण व नागरिकांच्या हस्ते कंदोरी हा धार्मिक कार्यक्रम घेण्यात आला. सायंकाळी 7.30 वा. श्री कानिफनाथ महाराजांचे भजन व आरती घेण्यात आली. त्यामध्ये भक्तगणांनी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी नागोठणे ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता मंदिर विश्वस्त समितीचे सचिव भाई टके, नागोठण्याचे माजी सरपंच विलास चौलकर, जयराम पवार, माजी उपसरपंच सुनिल लाड, माजी उपसरपंच मोहन नागोठणेकर, सदस्य संतोष नागोठणेकर, बिपीन सोष्टे आदींसह पोलिस कर्मचारी, पत्रकारांसह अनेक मान्यवर व ग्रामस्थ यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते. त्यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाने या धार्मिक सोहळ्याचा समारोप करण्यात आला.