पोलादपूरच्या ग्रामदैवतांचा होलिकोत्सव

| पोलादपूर | प्रतिनिधी |

शहराचे ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ जोगेश्‍वरी देवस्थानाचा होलिकोत्सव सोमवार (दि.6) पासून सुरू होत आहे. रविवार (दि.12) ग्रामदैवतांची नगरप्रदक्षिणा होऊन या होलिकोत्सवाची सांगता होणार असून याकाळात पोलादपूर शहरातील भैरवनाथनगर सहाणेवर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच बाबूराव महाडीक व सचिव विजय ग.पवार यांनी दिली आहे. दरम्यान, या उत्सवापूर्वी पोलादपूर ग्रामदैवता श्रीकाळभैरवनाथ, श्रीजोगेश्‍वरीमाता व श्रीदेव रवळनाथांचे चांदीचे नवीन मुखवटे सोमवारी पालखीतून सहाणेवर येणार असल्याने भाविकांमध्ये उत्कंठा वाढली आहे.

रात्री 12 वाजून 15 मिनीटांनी होळी प्रज्वलन करण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी धुलीवंदन झाल्यानंतर रात्री जाखमातानगरकडे भजन सेवा आहे. बुधवारी रात्री भजन, गुरूवारी श्रीसत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. रात्री आदिशक्ती महिला मंडळाची भजनसेवा होणार आहे. शुक्रवारी रात्री भजन, शनिवारी रात्री ग्रामस्थांची सभा झाल्यानंतर रात्री 12 वाजल्यानंतर ग्रामदैवतांचा गोंधळ आयोजित करण्यात आला आहे. रविवारी रंगपंचमीला ग्रामदेवतांची पालखीतून नगरप्रदक्षिणा होऊन सायंकाळी श्रीकाळभैरवनाथ देवस्थानामध्ये ग्रामदैवत परतणार आहेत. शनिवार (दि. 4) श्रीकाळभैरवनाथ, श्रीदेवी जोगेश्‍वरीमाता आणि श्रीदेव रवळनाथांचे चांदीचे नवीन मुखवटे चिपळूण येथून घडवून देवस्थानामध्ये सवाद्य मिरवणुकीने आणले असल्याने सोमवारी सहाणेवर या ग्रामदेवतांचे आगमन पालखीतून होणार असल्याने पोलादपूरकर भाविकांमध्ये प्रचंड उत्कंठा दिसून येत आहे.

Exit mobile version