विद्यार्थ्यांची उपक्रमाला मोठी पसंती
कोरोना काळात फायदा झाल्याचे पालकांचे मत
नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील रा.जि.प. शाळा हुमगाव येथील शिक्षिका संगीता नकाते यांनी ‘घरोघरी शाळा’ हा उपक्रम हुमगाव गावात पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केला होता. त्याद्वारे विद्यार्थ्याना त्यांच्या घरी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले होते. त्याचाच वापर करून विद्यार्थी आज वाचू, लिहू लागले आहेत. त्यामुळे या नवोपक्रमाबद्दल या शिक्षिकेवर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
जिल्हा परिषद शाळा हुमगाव येथील सहशिक्षिका संगीता गणेश नकाते यांनी सातारा येथील संजय खरात सरांनी सुरू केलेल्या घरोघरी शाळा ह्या उपक्रमाची सुरुवात हुमगाव या गावी केली होती . हा उपक्रम इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आला आहे. या उपक्रमात गावातील विद्यार्थ्यांच्या घरी काही शैक्षणिक साहित्याचे वाटप करत तसेच काही तक्ते आणि चित्रे देत विद्यार्थ्यांना वाचन आणि लेखन करणे सोय होईल यासाठी त्यांच्या घरी सगळी सोय करून देण्यात आली होती. गावातील घरे आणि भिंती ह्यांचा वापर ह्या घरोघरी शाळा ह्या उपक्रमासाठी करण्यात आला असून प्रत्येक मुलाला त्याच्या सोयीनुसार वाचन आणि लेखन करण्याच्या कौशल्याला वाव देता येत आहे. कोरोना काळात मुलांना मोबाईलवर काम करायला मिळाले होते; परंतु त्याचा होणारा गैरवापर आणि अतिवापर ह्या गोष्टीमुळे मोबाईलचे व्यसन ही सर्व पालकांना डोकेदुखी ठरली होती.
मुलांना मिळालेल्या शैक्षणिक साहित्य आणि चित्रांमुळे मुलांना वाचनाची आणि लेखनाची आवड निर्माण झाल्याचे तसेच शाळेविषयी आपुलकी निर्माण झाली आहे आणि पालकांनी बोलताना सांगितले. विद्यार्थ्याला हवं तेव्हा तो आपल्या घरातच असलेल्या शाळेत जाऊन अभ्यास करत असल्यामुळे विद्यार्थ्याच्या प्रगतीचा आलेख झपाट्याने वाढताना दिसत आहे. तसेच त्यांचे मोबाईलचे व्यसनदेखील दूर झाल्याचे पालकांनी बोलताना सांगितले आहे.
तक्ते, शब्द, चित्रे, जोडशब्द, बाराखडी अशा अनेक गोष्टी मुलांना त्यांच्याच घरी उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थी आपल्या गतीने वाचन, लेखन करत आहेत आणि आनंदाने सर्व साहित्य हाताळत आहेत. त्यामुळे सर्व पालक वर्ग आणि विद्यार्थी खुश असून, पालकांना हा उपक्रम आवडला आहे. मी केलेल्या मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटत आहे.
संगीता गणेश नकाते, शिक्षिका, रा.जि.प. शाळा हुमगाव