सफाई कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| खोपोली | प्रतिनिधी |

खोपोली शहरात गणेश उत्सवाच्या वातावरणात सर्वजण व्यस्त असताना शास्त्रीनगरमधील इतराज कुटुंबाने नेहरू गार्डनमधे गणेशमूर्तीचे कृत्रिम तलावात विधीवत विसर्जन केले आणि जमा झालेले निर्माल्य तेथील कलशात समर्पित केले. विसर्जनानंतर ते कुटुंबीय शास्त्रीनगर येथील आपल्या घरी गेले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, त्यांनी आवडीने श्रीगणेशाच्या गळ्यात घातलेली साधारणतः 20 ग्रॅम वजनाची सोनसाखळी निर्माल्यासोबत निर्माल्य कलशात समर्पित केली गेली. त्यानंतर त्यांनी तातडीने विसर्जन स्थळी जाऊन तेथे उपस्थित असलेल्या खोपोली नगरपालिकेचे आरोग्य विभागाचे मुकादम मंगेश चंदर वाणी यांना ही बाब सांगितली. त्यांनी सफाई कर्मचारी सुनील धाकू गायकवाड यांच्याकरवी निर्माल्य कलशातल्या पिशव्यांची तपासणी करून त्यात भूलचुकीने हारासोबत गेलेली सोनसाखळी शोधून इतराज कुटुंबाच्या हवाली केली. दरम्यान, भक्तीभावाने पूजाअर्चा केल्यानेच आपल्याला गणेशाने असा कृपाशीर्वाद दिल्याची भावना इतराज यांनी बोलून दाखवली. खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, उपमुख्याधिकारी रणजीत पवार यांनी नगरपालिकेच्या सभागृहात संबंधित प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे आणि पोलीस उपनिरीक्षक पूजा चव्हाण यांनीही त्यांचे कौतुक केले.

Exit mobile version