| पाली-बेणसे । वार्ताहर
मार्गशीर्ष महिना संपताच अंबा नदीत निर्माल्याने भरलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा खच पडला आहे. याबाबत सुज्ञ नागरिकांकडून संताप व्यक्त होत असून तीन-चार दिवसांनंतरही निर्माल्य नदीपात्रात तसेच पडून आहे. सुधागडवासीयांबरोबरच पालीकरांची जीवनदायिनी म्हणून अंबा नदी ओळखली जाते. संपूर्ण पालीसह आजूबाजुच्या गावांना नदीतून पाणी पुरवठा होतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून नदीपात्राला निर्माल्याचा विळखा पडला आहे. त्यामुळे पाणी दूषित झाले आहे.
घरात देवपूजेसाठी वापरलेली फुले, हार, पाण्यात विसर्जित केले जातात. मात्र त्यामुळे नदीपात्र, तलाव, विहिरी दूषित होत असल्याने अनेकठिकाणी निर्माल्य कलश ठेवले जातात. तर काहीजण खतनिर्मितीसाठी निर्माल्य वापरतात. याबाबत प्रशासनाकडूनही नियमित जनजागृती करण्यात येते, असे असले तरी पालीतील नदीपात्रात निर्माल्याचा खच पडलेला दिसतो. प्लास्टिकच्या पिशव्यांमधून निर्माल्य टाकण्यात आले आहे. पावसाळ्यात वाहत्या पाण्याला प्लास्टिक पिशव्यांचा अडथळा निर्माण होऊन पूर सदृश स्थिती निर्माण होते. शिवाय जैवविविधतेलाही धोका पोहचतो.
आरोग्याचा प्रश्न गंभीर
अंबा नदीत आजूबाजूच्या कंपन्यांमधून दूषित पाणी सोडले जाते. प्रदूषणामुळे पाण्याला उग्र वास येतो. चवही खराब लागते. सर्व पालीकर पिण्यासाठी व घरगुती वापरासाठी अंबा नदीच्याच पाण्याचा वापर करतात. हे पाणी प्रदूषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
प्लास्टिकच्या पिशव्यांमधून निर्माल्य पाण्यात टाकल्याने ते तसेच पडून राहते लवकर डी कंपोस्ट होत नाही. नागरिकांनी निर्माल्य निर्माल्य कलशात टाकावे किंवा आपल्या परिसरातील चांगल्या मातीमध्ये खड्डा करून पुरावे व त्यातून खत निर्मिती करावी. यामुळे पर्यावरणाचे संवर्धन देखील होईल. याशिवाय बल्लाळेश्वर देवस्थानतर्फे निर्माल्यापासून खत निर्मिती केली जाते तेथेही निर्माल्य देऊ शकतात. – कपिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते, पाली