श्रीवर्धनमधील शेतकर्‍याचा सन्मान

| दिघी । वार्ताहर ।

श्रीवर्धन तालुक्यातील काळींजे येथील अमर तोडणकर यांचा कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कृषी विभागामार्फत आयोजीत केलेल्या भात पीक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल सन्मान चिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.

पनवेल येथे आयोजीत करण्यात आलेल्या रायगड कृषी महोत्सव सोहळा नुकताच पार पडला. राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध भागामध्ये शेतकर्‍यांसाठी प्रमुख पिकाची स्पर्धा राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत घेतली जाते. यात प्रयोगशील शेतकर्‍यांना उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देण्यासाठी गौरवले जाते. त्यामुळे शेतकर्‍यांची इच्छाशक्ती व मनोबल वाढते. तसेच इतर शेतकर्‍यांनाही स्फूर्ती मिळते. याचाच भाग म्हणून रायगड विभागामध्ये 2022-23 मध्ये श्रीवर्धन तालुक्यामध्ये तालुका स्तरीय भात पीक स्पर्धा आयोजित केली होती. त्यात 12 शेतकर्‍यांनी भाग घेतला होता. एका बाजूला मजुरांची कमतरता, वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान तसेच लहरी हवामानामुळे शेतकरी वर्ग शेतीपासून दुरावत आहे. असे असतानाही तालुक्यातील प्रतिकूल हवामानाचा सामना करत तोडणकर यांनी आधुनिक बियाणांचा व नवीन लागवड पद्धती सोबत तंत्रज्ञानाचा वापर करत चांगले उत्पादन घेऊन पीक स्पर्धेमध्ये नावलौकीक मिळवला आहे. स्पर्धेमधील सहभागी शेतकर्‍याच्या भाताची कापणी करताना संबंधित समितीद्वारे पर्यवेक्षण करून उत्पादकतेच्या आधारे क्रमांक काढण्यात आले.

तालुका स्तरावर अमर यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यांनी सुवर्णा या वाणाची लागवड चारसूत्री पद्धतीने केली होती तसेच 84.80 किलो प्रति गुंठा विक्रमी उत्पादन घेतले. तालुक्यातून कृषी अधिकारी दौलत कुंभार, मंडळ अधिकारी गाताडी, कृषी पर्यवेक्षक सयाजी इंगळे, कृषी सहायक पंकज पाटील यांचे शेतकर्‍यांना मार्गदर्शन लाभले. अमर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Exit mobile version