| नागोठणे | प्रतिनिधी |
बेभरवशाच्या पावसामुळे मला शेती करता आली नाही आणि त्यामुळे नोकरी स्वीकारावी लागली. मात्र, रायगड जिल्ह्यात शेतीसाठी अत्यंत पोषक वातावरण आहे. त्यामुळे तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता शेती व शेतीपूरक व्यवसायाकडे वळले पाहिजे. सेंद्रिय शेती ही काळाची गरज असून, रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे कर्करोगासारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे गांडूळ खताचा वापर करून येथील शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीला व कृषी पर्यटनाला प्राधान्य द्यावे, असे बहुमोल मार्गदर्शन नागोठण्याचे प्रभारी अधिकारी आणि कृषी विषयात एमएससी पदवी प्राप्त केलेले रविंद्र पारखे यांनी केले.
रायगड प्रेस क्लब संलग्न नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनच्यावतीने शेतकरी सन्मान पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी (दि.24) नागोठण्याजवळील ऐनघर ग्रामपंचायत कार्यालयात पार पडला. त्यावेळी रविंद्र पारखे बोलत होते. यावेळी प्रगतशील ज्येष्ठ शेतकरी महादेव मोहिते, तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकरी मनिष जांबेकर यांना मान्यवरांच्या हस्ते शेतकरी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे भाई टके, नागोठण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि रविंद्र पारखे, रोहा तालुका कृषी अधिकारी महादेव करे, ऐनघर ग्रामपंचायत अधिकारी गोविंद शिद, सरपंच कलावती कोकळे, माजी उपसरपंच मनोहर सुटे, तलाठी योगेश वार्डे, पत्रकार असो.चे शामकांत नेरपगार, ॲड. महेश पवार, राजेंद्र जोशी, विनोद भोईर, दिनेश ठमके, राजेश पिंपळे, वर्षा सहस्त्रबुद्धे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. महेश पवार यांनी केले.
शेतकरी सन्मान पुरस्काराने गौरव
