| कर्जत | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील पन्नास ग्रामस्थांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे. त्यांचा सन्मान श्री छत्रपती शिवाजी मंडळ, कर्जत व लक्ष्मी नेत्रपेढी, पनवेलच्यावतीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यापैकी काही जणांनी अवयव दान व देहदान करण्याचा निर्णयही घेतला आहे.
श्री मारुती मंदिराच्या सभागृहात नेत्रदानाचा संकल्प केलेल्या नागरिकांच्या प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्याच्या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. लक्ष्मी नेत्र पेढीचे प्रभारी डॉ. संकेत गांधी यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर दीप प्रज्वलित करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे विजय मांडे, डॉ. अलका जाधव, विजय हरिश्चंद्रे, दत्ता म्हसे आदी उपस्थित होते. माजी अध्यक्ष अशोक शिंदे, खजिनदार अरुण विशे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शिंदे यांनी प्रास्ताविकात मंडळाच्या एकोणसत्तर वर्षांच्या वाटचालीची माहिती सांगितली. विजय हरिश्चंद्रे यांनी नेत्रदान उपक्रमाची माहिती देऊन जास्तीत जास्त जणांनी नेत्रदान करावे, असे आवाहन केले.
डॉ. गांधी यांनी दृश्राव्य पद्धतीने नेत्रदान कुणी, कसे, कधी करावे. कुणी करू नये याची माहिती देऊन नेत्रदान केलेल्याचे निधन झाल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी धीर देऊन नेत्रदान करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना केली. यावेळी अरविंद पाटील, अर्जुन वाघ, राजन चौधरी यांनी नेत्रदान करताना येणार्या शंका विचारल्या. डॉ. गांधी यांनी त्यांच्या स्स्यांचे समाधानकारक निरसन केले. त्यानंतर मांडे यांच्या हस्ते नेत्रदानाचा संकल्प करणार्या नागरिकांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. मांडे यांनी ‘मरणोत्तर नेत्रदान करण्यास अडचण येत असेल तर एक सर्व समावेशक समिती स्थापन करावी’, असे सूचित करून ‘गावागावात जाऊन नेत्रदानाचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे.’ सांगितले. दत्ता म्हसे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. विकास चित्ते यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी शुभांगी सुळे यांनी आल्या दोन कन्या मानसी व सुश्मिता यांच्या समवेत, संतोष माळगुंडकर यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपली पत्नी श्रुती यांच्यासह नेत्रदानाचा संकल्प केला. वृषाली मराठे यांनी आपला सुपुत्र अभिजीतसह नेत्रदानाचा संकल्प केला. संदीप मराठे यांनी आपल्या मातोश्री अर्चना व पत्नी साक्षी यांच्यासह, रमेश भागवत यांनी आपल्या पत्नी शोभा यांच्यासह, अरविंद रेगे यांनी आपली पत्नी अनिता यांच्यासह, जिग्नेश शहा यांनी आपली पत्नी निकिता यांच्यासह, प्रभाकर कुलकर्णी यांनी आपली पत्नी पद्मा यांच्यासह, राहुल तिटकारे यांनी आपली पत्नी वैशाली यांच्यासह, आणि श्रीकृष्ण जोशी यांनी आपली पत्नी अनुराधा यांच्यासह नेत्रदानाचा संकल्प केला. याप्रसंगी वसंत ठाकूर, पंच्छी गुप्ता, हरिश्चंद्र राऊत, उमेश शेट्ये आदी उपस्थित होते.