रायगड रॉयल रायडर्सचा नाविन्य उपक्रम
| अलिबाग | प्रतिनिधी |
मुलींचे अपहरण, महिला, तरुणींवरील अत्याचार अशा अनेक घटना घडत आहेत. यामुळे या घटनांना रोखण्यासाठी रायगड रॉयल रायडर्स ग्रुपने एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. अलिबाग तालुक्यातील वावे ते श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर पर्यंत दोन दिवस दुचाकी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीतून बेटी बचावचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
तालुक्यातील वावे पंचक्रोशीतील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या या ग्रुपने गेल्या चार वर्षांपासून दुचाकी रॅलीतून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न कायमच करत आहेत. मागील चार वर्षांपासून महाबळेश्वर, नाशिक, गोवा, माळशेत या ठिकाणी दुचाकी रॅली काढण्यात आली असून या रॅलीमार्फत झाडे लावा झाडे जगवा, स्वातंत्र्य दिनाचे महत्व, हर घर तिरंगा, हेल्मेट, शिक्षणाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावर्षी या ग्रुपतर्फे दोन दिवस दुचाकी रॅली काढण्यात आली. शनिवारी (दि.10) सकाळी वावे येथून या रॅलीला सुरूवात करण्यात आली. रोहा मार्गे, तळा ते श्रीवर्धनमधील हरिहरेश्वरपर्यंत ही रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये 14 हून अधिक दुचाकी स्वारांनी सहभाग घेतला होता.
यावेळी दुचाकी चालवत असताना अनेक गावांना भेटी देऊन तेथील जनतेशी संपर्क साधून मुलीच्या शिक्षणाचे महत्व, मुली, महिलांचे समाजात असलेले महत्वाचे स्थान याची माहिती देऊन बेटी बचावचा संदेश पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच, हरिहरेश्वर येथील मंदिरात दर्शन घेऊन या रॅलीची सांगता करण्यात आली.