सुधागडातील महिला शिक्षिकांच्या कर्तृत्वाचा सन्मान

‌‘एक दिवस माझा‌’ विशेष उपक्रम

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

सुधागड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळेच्या प्राथमिक शिक्षिकांनी पालीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ‌‘एक दिवस माझा‌’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महिला शिक्षिकांमधील सुप्त गुणांना वाव देणारा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणारा हा सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला.

या कार्यक्रमाची सुरुवात विद्यादेवता माता सरस्वती, राजमाता जिजाऊ, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि आई रमाई यांच्या प्रतिमा पूजनाने व स्वागत गीताने झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या शर्मिला शरद बोडके, सुधागड तालुक्याच्या सभापती जागृती राजेश मानकर, पंचायत समिती सदस्या प्रणिता राजेश परदेशी, माजी सरपंच श्रद्धा गणेश कानडे, बौद्ध पंचायत महिला कमिटी अध्यक्ष अस्मिता अविनाश कांबळे, रेश्मा राजेश गायकवाड आणि दीक्षा दीपक दंत या महिला मान्यवर उपस्थित होत्या.

शिक्षण विभागातर्फे आयोजित विविध स्पर्धांमध्ये राज्यस्तरावर यश संपादन करणाऱ्या शिक्षिकांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यामध्ये संगीता औताडे (शब्दकोडे निर्मिती स्पर्धा) चतुर्थ क्रमांक, शीतल पाटील (डॉक्युमेंटरी स्पर्धा) सातवा क्रमांक, रूपाली पांढरे (थाळी फेक स्पर्धा) आठवा क्रमांक, भाग्यश्री हाके (गोळा फेक स्पर्धा) आठवा क्रमांक तसेच, विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल स्मिता जगताप यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार, अर्चना साळुंके यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ सन्मान पुरस्कार आणि वृषाली गुरव यांना जिल्हा परिषद आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. विभाग व तालुका स्तरावरील यशस्वी शिक्षिकांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्यात महिला शिक्षिकांनी सादर केलेल्या सामुहीक नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. मनोरंजक खेळांमध्येही शिक्षिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि विजयी स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. उमा उप्पार यांनी काढलेली मनमोहक रांगोळी आकर्षणाचे केंद्र ठरली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रज्ञा काळभोर यांनी केले, तर सर्वांनी जयश्री जाधव यांनी तयार केलेल्या भोजनाचा आस्वाद घेतला.

‌‘एक दिवस माझा‌’ ही संकल्पना स्मिता जगताप यांची होती. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जाधव, काळभोर, जगताप, मृणालिनी म्हात्रे, हूले, बाबर, गुरव, कडाळे, अश्विनी, सुर्वे, भोजकर, आघाव, पालवे आणि साळुंके यांनी केंद्र समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली. खेळांचे नियोजन रूपा गाडेवार आणि सुनिता कडाळे यांनी केले. या उपक्रमासाठी सुधागड पंचायत समिती सदस्या सुनीता किसन लेंडी आणि गटविकास अधिकारी लता मोहिते यांनी शुभेच्छा संदेश दिले. सर्व महिला शिक्षिकांना एका मंचावर आणून त्यांचा सन्मान करणारा हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी ठरला.

Exit mobile version