| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग महसूल मंडळ आणि नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अलिबागमधील जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूलच्या सभागृहात पार पडले. या शिबिरामध्ये दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थीनी आदिती शिंदेचा देखील सत्कार करण्यात आला. ती बारावी परीक्षेत 600 पैकी 555 गुण मिळवत 92.50 टक्के गुणांसह उत्तीर्ण झाल्यामुळे तिचा विशेष सत्कार करण्यात आला. अदितीने बारावीनंतर पुढील पाच वर्षांचा एलएलबी अभ्यासक्रम पुण्यात करण्याचा निर्णय घेतला असून, कायदा क्षेत्रात करिअर घडवण्याचा तिचा निर्धार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच, या कार्यक्रमादरम्यान दहावी आणि बारावीतील इतर गुणवंत विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते अनेक लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात आला. यावेळी अलिबागच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार विक्रम पाटील, नगरसेवक अनिल चोपडा, अश्विनी ठोसर, ॲड. निवेदिता वाघमारे, शैला भगत, सुषमा पाटील, समीर ठाकूर, संदीप पालकर, जमाल सय्यद, ॲड. अंकित बंगेरा, मुख्याधिकारी सागर साळुंखे, निवासी नायब तहसीलदार संदीप जाधव, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार अजित टोलकर, मंडळ अधिकारी रुपेश रेवसकर, रविकांत जाधव, ग्राम महसूल अधिकारी गणेश लोहार, स्वाती गायकवाड, हेलमता बोबडी यांच्यासह महसूल व नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.







