अश्‍वपालकांनो, गैरवर्तवणूक करू नका; पोलिसांकडून सज्जड इशारा

माथेरान प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
। माथेरान । वार्ताहर ।
माथेरान प्रशासनाने पर्यटकांची दिशाभूल आणि फसवणूक थांबवा अन्यथा आपला परवाना कायमचा रद्द करण्यात येईल, असा सज्जड इशारा घोडेवाल्यांना देण्यात आला आहे. यावेळी घोडा पासिंग करणे, त्यांना परवाना देण्याबाबत काही अटी व नियम सांगण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते.
माथेरानमध्ये प्रवेशद्वार दस्तुरी येथे पर्यटकांची दिशाभूल होते, त्यांना फसवलं जातं, अशा तक्रारी सतत वाढत होत्या. पण, नगरपालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाही होत नव्हती. अशा बातम्या अनेक वृत्तपत्रांत प्रसिद्ध होत होत्या. याच अनुषंगाने पोलीस, नगरपालिका, महसूल विभाग, वन विभाग, आरोग्य विभाग तसेच माथेरानमधील दोन्ही अश्‍वपाल संघटना पदाधिकारी, सर्व अश्‍वचालक व मालक यांची संयुक्त सभा माथेरान पोलीस ठाण्याच्या प्रांगणात झाली.
या बैठकीला कर्जत तालुका उपविभागीय अधिकारी विजय लगारे, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक सुरेखा भणगे, वन विभागाचे वनक्षेत्रपाल उमेश जंगम, पशुधन विकास अधिकारी डॉ. अमोल कांबळे, महसूल विभागाचे लिपिक अक्षय जाधव तसेच या सभेचे आयोजन करणारे सहायक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे, स्थानिक अश्‍वपाल संघटनेच्या अध्यक्षा आशा कदम, मूळवासीय अश्‍वपाल संघटनेचे अध्यक्ष संतोष शिंगाडे तसेच बहुसंख्य अश्‍वपाल उपस्थित होते.
सुरुवातीला घोडेवावाल्यांच्या समस्या जाणून घेतल्या यामध्ये प्रामुख्याने गेली आठ वर्षे दर वाढवला नसल्याने दर वाढवावा असे घोडेवाल्यांकडून सांगण्यात आले.तसेच चढ उतारावर क्ले पेव्हर ब्लॉक लावले आहेत त्यामुळे घोडे त्यावरून घसरत आहेत.ते पेव्हर ब्लॉक काढावे असे ही सांगण्यात आले.तसेच अनेक ठिकाणी घोडा स्टँड नसल्याचे सांगण्यात आले.यावर पुढील काही दिवसात दर निश्‍चित वाढविले जातील तसेच क्ले पेव्हर ब्लॉक काढून त्या जागेवर जांभा दगड बसविला जाईल आणि जिथे कुठे घोडा स्टँड हवेत ते बांधण्यात येतील, असे मुख्याधिकारी सुरेखा भणगे-शिंदे यांनी स्पष्ट केले.

प्रीपेड सेवा लवकरच
दस्तुरी येथे पुढच्या सात ते आठ दिवसात प्रीपेंड सेवा सुरू करण्याचे सूतोवाच मुख्याधिकारी सुरेखा भणगे-शिंदे यांनी सभेत दिले. पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा सर्व प्रशासन अधिकार्‍यांशी चर्चा करून ही प्रीपेड सेवा सुरू केली जाईल, त्यामुळे कोणीही गाडीच्या मागे न धावता नगरपालिकेने बनविलेल्या प्रीपेड सेवा केंद्रामधून नाव नोंदवून नंबरप्रमाणे घोडे पर्यटकांसाठी न्यावे, असे मुख्याधिकारी सुरेखा भणगे-शिंदे यांनी सांगितले.

Exit mobile version