माथेरान मध्ये घोड्यांची मिरवणूक

| नेरळ | प्रतिनिधी |

विजयादशमी निमित्त माथेरानमध्ये अश्वपालक आणि अश्वचालक यांच्याकडून घोड्यांची मिरवणूक काढली जाते. हा सण साजरा करण्यासाठी गुरूवारी (दि.2) माथेरान शहरातील सर्व घोड्यांना सजवून रस्त्यावर आणण्यात आले होते. दरम्यान, या घोड्यांनी अनेक प्रकारचे संचालन करून सर्वांची वाहवा मिळवली.

कर्जत-माथेरानमधील पर्यटनाचे प्रमुख आकर्षण असलेल्या घोड्यांच्या रॅलीने येथे आलेल्या पर्यटकांची मने जिंकली. स्थानिक अश्वपाल संघटनेची 1972 मध्ये स्थापना झाली, तेव्हापासून या दसऱ्याच्या सणाला अश्वपाल उत्सव म्हणून साजरा करतात. पूर्वीच्या काळी पावसाळ्यात चार महिने घोडे हे पर्यटकांसाठी बंद असत. जोरदार पाऊस पडत असल्याने घोडे हे तबेल्यातच असायचे आणि दसऱ्याच्या दिवशी घोड्यांना अंघोळ घालून, त्यांना सजवून मिरवणूक काढण्यात आली. दसऱ्याच्या दिवशी घोड्यांना सजवून विधिवत पूजा करून घोड्यांना रॅलीमध्ये आणण्यात आले. दसरा हा सण अश्वपालकांनी प्रतिवर्षाप्रमाणे ‌‘उत्सव अश्वांचा’ म्हणून साजरा केला. परंपरागत चालत आलेल्या उत्सवात सर्व अश्वपालक मोठ्या भक्तिभावाने रमले. यामध्ये घोड्याच्या तबेल्याचीसुद्धा पूजा करण्यात आली. दसऱ्याचा सण हा महत्त्वाचा सण मानून या दिवसापासून आपल्या नवीन वर्षाच्या रोजगाराला सुरुवात करण्यात आली.

Exit mobile version