| माथेरान । वार्ताहर ।
माथेरान हे पर्यटनस्थळ असून या पर्यटनस्थळा वर आलेला प्रत्येक पर्यटक हा घोड्यावर बसून रपेट मारल्याशिवाय काही येथून जात नाही. घोडा हे येथील प्रमुख आकर्षण आहे. येथे पावसाळी चार महिन्यांच्या विश्राती नंतर विजया-दशमीच्या शुभमुहूर्तावर घोडा व्यवसाय सुरू करण्यात येतो. यावर्षी सुध्दा पूर्वापार चालत आलेल्या परंपरे नुसार घोड्यांची विधिवत पूजा करून घोड्यांना परिपूर्ण सजवून मग येथील मुख्य श्रीराम चौकातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली.
इथे येणार्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. या विजया-दशमीच्या सणाला इथे सर्व घोड्यांना वेगवेगळ्या रंगीबिरंगी फुलांनी, रंगीत झुलानी, फुग्यांनी, सजविण्यात येते. या दिवशी येणार्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ढोल-ताश्यांच्या तालावर घोड्यांना येथे नाचविले जाते आणि नंतर त्यांची मिरवणूक देखील काढली जाते. वर्षनुवर्षं सुरू असलेल्या या प्रथेला अश्वचालक आजही त्याच उत्साहाने, आनंदाने सहभागी होऊन आपला आनंद द्विगुणित करतात. यावर्षी पहिल्यांदाच विजया-दशमी निमित्त अश्वपालकांनी एकत्रित येऊन मुख्य श्रीराम चौकात सभेचे आयोजन केले होते. यावेळी दिवंगत माजी पदाधिकारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अश्वपालकांचे सत्कार देखील करण्यात आले. यावेळी आशा कदम, संतोष शिंगाडे आणि आजीमाजी पदाधिकारी उपस्थित होते.
दसरा हा सण आम्ही घोडेवाले खूप महत्वाचा मानतो. या दिवसापासूनच व्यवसाय प्रारंभ करतो. घोड्याची मनोभावे पूजा करून त्याला सजवून आमच्या अश्वपाल संघटने मार्फत त्यांची मिरवणूक काढली जाते.
जयराज बर्गे,
अश्वपालक
दसर्याच्या सुट्टी निमित्त माथेरानला आलो होतो. दुपारच्या सत्रात फिरत असताना वेगवेगळ्या प्रकारे सजलेले घोडे पाहिले. याबाबत माहिती घेतली असता हा येथील अश्वपालकांचा सर्वात मोठा सण आहे असे समजले म्हणून घोड्यावर बसून घोड्याची एक रपेट केली.
विनायक परब,
पर्यटक, मुंबई