अन्न, औषध प्रशासनाचे दुर्लक्ष
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत-चौक राज्यमार्गावर दि प्लेट नावाचे तारांकीत सुविधा देणारे हॉटेल आहे. हे हॉटेल गेली दोन वर्षे या ठिकाणी सुरु असून, हॉटेलकडे हॉटेल व्यवसाय करण्याचे कोणतेही परवाने नाहीत. त्याचबरोबर अन्न व औषध प्रशासन याकडे जाणूनबुजुन दुर्लक्ष करत असून, त्यांचा वरदहस्त आहे का, अशी चर्चा देखील होत आहे. दरम्यान, या हॉटेलवर शासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करणारा इमेल सामाजिक कार्यकर्ते विजय गायकवाड यांनी संबंधित प्रशासनाला पाठविला आहे.
कर्जत-चौक राज्यमार्गावर दि प्लेट नावाचे तारांकीत सुविधा देणारे हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये विजय गायकवाड हे गेले असता संबंधित बिल अदा केल्यानंतर त्या बिलावर युटिलिटी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाने दि प्लेट हॉटेलकडून बिल देण्यात आले होते. परंतु, या बिलावर अन्न, औषध परवाना छापण्यात आलेला नव्हता. त्याबद्दल विजय गायकवाड यांनी हॉटेल व्यवस्थापनाशी विचारणा केली आणि अन्न, औषध प्रशासनाने दिलेल्या परवान्याची मागणी केली. त्यावेळी हॉटेलचे व्यवस्थापक सट्टीवर असल्याचे सांगण्यात आले. मात्र, गायकवाड हॉटेलमध्येच बसून राहिल्याने शेवटी तासाभराने त्यांना हॉटेल व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले की, अन्न व औषध परवाना मिळविण्यासाठी प्रक्रिया सुरु केली आहे, अशी माहिती दिली. त्यामुळे हे हॉटेल दोन वर्षे सुरु असताना त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे अन्न व औषध परवाना नाही, त्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तसेच, विजय गायकवाड यांनी हॉटेल व्यवस्थापनाकडे एमएसआरडीसीचे ना हरकत दाखला दाखवण्याची मागणी केली. मात्र, हा दाखला देखील दि प्लेट हॉटेल व्यवस्थापनाकडे नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या हॉटेलवर राज्य रस्ते विकास महामंडळ आणि अन्न, औषध प्रशासनाचा वरदहस्त आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, गायकवाड यांनी अन्न, औषध प्रशासनाचे जिल्हाधिकारी निकम यांच्याशी संपर्क साधला असता, दि प्लेट नावाचे हॉटेल कुठे आहे, याची देखील माहिती नसल्याची त्यांच्याकडून प्रतिक्रिया दिली गेली. त्यानंतर अन्न, औषध उपायुक्त मि.र. महांगडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी त्या हॉटेलची चौकशी करण्यासाठीचे तक्रार अर्ज पाठवण्याच्या सुचना केल्या. दरम्यान, विजय गायकवाड यांनी तात्काळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच राज्याचे अन्न, औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह संबंधित अधिकऱ्यांना इमेल द्वारे अर्ज करत दी प्लेट या तारांकीत सेवा देणाऱ्या हॉटेलवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
दि प्लेट या हॉटेलमध्ये तारांकित हॉटेलसारखे दर आहेत. मात्र, तशा कोणत्याही सुविधा या हॉटेल व्यवस्थापनाकडे नाहीत. तसेच, अन्न, औषध प्रशासनाचा दखला मागितला असता, असा दाखला त्यांच्याकडे नसल्याचे सांगितले गेले. याबाबत राज्य सरकारकडे तक्रार केली आहे. शासनाने या हॉटेलची चौकशी करावी आणि कारवाई करावी.
विजय गायकवाड,
सामाजिक कार्यकर्ते







