एका व्यक्तीसह कुत्र्याची सुखरूप सुटका
। पनवेल | प्रतिनिधी ।
नवीन पनवेल सेक्टर-4 मधील कॉटेज एन.जी. प्लॉट क्र. 89 येथील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आज दुपारी आग लागण्याची घटना घडली. सदर आग लागल्याची माहिती मयूर शेळके यांनी नवीन पनवेल अग्निशमन केंद्राच्या कंट्रोल रूमला मोबाईलद्वारे दिली. माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यावर गॅलरीतून मोठ्या प्रमाणात ज्वाळा आणि धूर बाहेर पडत असल्याचे दिसून आले. परिस्थिती गंभीर असल्याने दरवाजा हातोड्याच्या सहाय्याने तोडून जवानांनी घरात प्रवेश केला. पाणी मारून आग नियंत्रणात आणण्याचे कार्य जलद गतीने करण्यात आले.
दरम्यान, किचनमध्ये एक पुरुष बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. जवानांनी कोणताही विलंब न करता त्याला सुरक्षित बाहेर काढत ॲम्बुलन्सच्या मदतीने तातडीने पुढील उपचारासाठी रवाना केले. त्याचबरोबर इमारतीच्या वरच्या मजल्यावर अडकलेल्या एका कुत्र्याला ही अग्निशमन दलाने यशस्वीपणे रेस्क्यू करून सुरक्षित बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या जवानांच्या तत्पर आणि धाडसी कार्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. अग्निशमन दलाने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवून परिसर सुरक्षित असल्याची खात्री केली.







