दिव्यांग, ज्येष्ठ बजावणार हक्क
| रायगड | वार्ताहर |
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी व कर्मचारी, पोलीस, लष्करी अधिकारी, जवान, दिव्यांग तसेच 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.
त्यानुसार 192-अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये दि.15 नोव्हेंबर रोजी होणार दिव्यांग, ज्येष्ठांचे गृहमतदान पार पडणार आहे. या मतदारसंघामध्ये अलिबाग, मुरुड, रोहा तालुक्यातील पोस्टल बॅलेटकरिता 85+ मतदार 461 व दिव्यांग मतदार 27 अशा मतदान करण्याकरिता पोस्टल बॅलेटसाठी 12 ड अर्ज दिले आहेत, अशी माहिती या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी आहे. गृहमतदानाकरिता 37 पथके कार्यरत राहणार असून, ही मतदान प्रक्रिया एक दिवस सुरू राहणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
193-श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये दि.14 व दि.15 नोव्हेंबर रोजी होणार दिव्यांग, ज्येष्ठांचे गृहमतदान होणार आहे. या मतदारसंघामध्ये माणगाव, तळा, रोहा, श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील पोस्टल बॅलेटकरिता 85+ मतदार 472 व दिव्यांग मतदार 116 यांना मतदान करण्याकरिता पोस्टल बॅलेटसाठी 12 ड अर्ज दिले आहेत. त्यानुसार गुरुवार, दि.14 व शुक्रवार, दि.15 नोव्हेंबर रोजी दिव्यांग व ज्येष्ठांचे गृहमतदान होणार असून, त्यासाठी 28 पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती श्रीवर्धनचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांनी दिली आहे.
190-उरण विधानसभा मतदारसंघामध्ये दि.15 नोव्हेंबर रोजी होणार दिव्यांग, ज्येष्ठांचे गृहमतदान होणार आहे. या मतदारसंघामध्ये पोस्टल बॅलेटकरिता 85 वर्षांवरील मतदार 68 व दिव्यांग मतदार 16 यांना पोस्टल बॅलेटसाठी 12 ड अर्ज दिले आहेत. त्यानुसार 85 वर्षांवरील 68 व दिव्यांग 16 मतदार अशा एकूण 84 मतदारांची गृहमतदानासाठी नोंदणी करण्यात आली आहे. याकरिता 7 पथके कार्यरत असणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार दिली आहे.
189-कर्जत विधानसभा मतदार संघामध्ये दि.15 व दि.16 नोव्हेंबर रोजी होणार दिव्यांग, ज्येष्ठांचे गृहमतदान पार पडणार आहे. या मतदार संघामध्ये पोस्टल बॅलेटकरिता 85+ मतदार 173 व दिव्यांग 16 यांना मतदान करण्याकरिता पोस्टल बॅलेटसाठी 12 ड अर्ज दिले आहेत. मतदानासाठी 8 पथके कार्यरत असणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कर्जत प्रकाश सकपाळ यांनी दिली आहे.
येत्या 20 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणूकीत मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजवावा, मतदानासाठी नागरिकांमध्ये जागरुकता यावी, म्हणून मतदारसंघात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. लोकशाहीच्या या उत्सवात मतदानाचे पवित्र कार्य पार पाडावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकार्यांनी केले आहे.
पनवेलमध्ये 137 मतदारांचे मतदान
188-पनवेल विधानसभा मतदारसंघात सोमवारी 137 मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पनवेल पवन चांडक यांनी दिली.मतदारसंघातील रहिवासी 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 124 ज्येष्ठ नागरिकांनी, 13 दिव्यांग मतदार यांनी घरबसल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. गोपनीय पद्धतीने मतदान करण्याची सुविधा पुरविण्यात येऊन संबंधित विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त करण्यात आलेल्या क्षेत्रीय अधिकारी, मतदान अधिकारी तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी गृहमतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. यावेळी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले.