दळवींच्या समर्थकांकडून कामास टाळाटाळ; स्थानिक ग्रामस्थांचा आरोप
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील नवेदर बेली येथील स्मशानभूमी निवारा शेडचे काम दोन वर्षांपूर्वी जिल्हा नियोजनमधून मंजूर झाले होते. आमदार महेंद्र दळवी यांच्या ठेकेदाराने या कामाला साधा दगडही लावला नाही. त्यामुळे हे काम अजूनही कागदावरच असून, ठेकेदाराकडून ते करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
अलिबागपासून काही अंतरावर नवेदर बेली गाव आहे. खाडी किनारी असलेल्या या गावालगत स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीसमोर निवारा शेड बांधण्याचे काम जिल्हा नियोजन समितीमार्फत 2022-23 मध्ये मंजूर झाले. मार्च 2024 पर्यंत त्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, या दोन वर्षांत साधा दगडही या जागेत बसविण्यात आला नाही. निवारा शेडचे काम न झाल्याने त्याचा फटका दळवी यांना विधानसभा निवडणुकीत बसण्याची भीती दळवी समर्थकांमध्ये झाली. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या हंगामातच गेल्या आठ दिवसांपूर्वी खडी, रेती, दगड टाकून ठेवले आहेत. गेल्या दोन वर्षांत दळवींच्या समर्थकांनी काम का केले नाही, असा संतप्त सवाल तेथील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
निवारा शेडच्या कामाची मुदत संपून आठ महिने होत आले आहेत. तरीदेखील निवारा शेडचे काम न झाल्याने अनेक ग्रामस्थांनी कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आमदार दळवी यांच्याकडून विकासाच्या बाता मारल्या जात आहेत. मात्र, ही कामे त्यांच्या समर्थकांकडून वेळेत पूर्ण करण्यास दळवी अपयशी ठरल्याची चर्चा जोर धरत आहे. त्यामुळे या निवडणुकीत ग्रामस्थांच्या रोषाला दळवींना सामोरे जावे लागणार आहे. त्याचा फटका बसण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
ऐन निवडणुकीत कामाचा दिखावा
दोन वर्षांत निवारा शेड करण्यास जमले नाही, ते आता निवडणूक जाहीर झाल्यावर दळवी समर्थकांच्या दुर्लक्षपणामुळे रखडलेले काम सुरु करण्याचा दिखावा करण्यात आला आहे. मात्र, येथील मतदार सुज्ञ असून, दिखावा करणार्यांना मतदार जागा दाखविणार, अशी संतापजनक प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थांमधून उमटत आहे.