| कोर्लई | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील नांदगाव गणेशनगर कुंभारवाड्यात गुरुवारी पहाटे साडेपाचच्या दरम्यान वीज कोसळल्याने घरातील वीज उपकरणे जळून नुकसान झाले, तर सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
तालुक्यात दोन दिवसांपासून सकाळ व सायंकाळच्या वेळी ढगाळ वातावरणानंतर पाऊस पडतो आहे. पहाटे पाच-साडेपाचदरम्यान नांदगाव कुंभारवाडा येथे वीज चमकली, मोठा आवाज झाला. यामुळे संध्या मिठाग्री व प्रवीण कोरलेकर यांच्या घरातील टीव्ही, पंखा, बल्ब, वायरिंग जळून दहा ते बारा हजारांचे, तर मनोहर मोकल यांच्या घरातील 55 इंची 57 हजारांचा एलईडी टीव्ही, पंखा व सिद्धेश तळेकर यांच्या घरातील टीव्ही, पंखा, एलईडी बल्ब उपकरणांचे जळून नुकसान झाले.
परिसरात विजांचा कडकडाट, वीजपुरवठा चालू असताना अचानक झालेल्या उच्च दाबामुळेच विद्युत उपकरणांचे नुकसान झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून, आम्हाला नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी आहे. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार आदेश डफळ यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव मंडळ सजाचे मंडळ अधिकारी मंगेश इग्रुळकर व तलाठी अनिल ढोले यांनी वीज कोसळून झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला आहे.






