ग्रामीण भागात घरोघरी नळजोडणी

जलजीवन मिशन अंतर्गत कृती आराखडा अभियान
जि.प. सीईओ डॉ. किरण पाटील यांची माहिती
| प्रतिनिधी |
ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत कार्यान्वित नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत 22 जुलै ते 7 ऑगस्ट 2021 दरम्यान गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये गावपातळीवर नळ जोडणीचा गाव कृती आराखडा तयार करण्यात येईल. या पंधरवडा अभियानात जिल्हा, तालुका व गाव पातळीवर सर्वांनी सहभाग घेऊन पंधरवडा अभियान यशस्वीरित्या राबविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
22 जुलै 2021 रोजी जल जीवन मिशन राज्य पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने ग्रामीण पाणीपुरवठा च्या कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, डाटा एंट्री ऑपरेटर तसेच जिल्हा कक्षाच्या सनियंत्रण मूल्यमापन सल्लागार यांना झूम अ‍ॅपद्वारे गाव कृती आराखडाबाबत प्रशिक्षण देण्यात येईल. यामध्ये गाव कृती आराखडामधील माहितीचे संकलन, राबविण्याच्या प्रक्रिया, कोबो टूलद्वारे माहिती अपलोडबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दुसर्‍या टप्प्यात 23 जुलै 26, 27 जुलै या कालावधीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत, उपअभियंता, शाखा अभियंता, भूवैज्ञानिक, मनुष्यबळ विकास सल्लागार, सनियंत्रण व मूल्यमापन सल्लागार, पाणी गुणवत्ता सल्लागार व तालुकास्तरावरील गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी पंचायत, उपअभियंता, शाखा अभियंता, गट समन्वयक, समूह समन्वयक यांना झूम अ‍ॅपद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे
तालुका पातळीवर गट विकास अधिकारी 28 ते 31 जुलैदरम्यान प्रशिक्षणाचे आयोजन करतील. यामध्ये गाव कृती आराखड्याबाबत सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, पंप ऑपरेटर, आशा वर्कर, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या दोन प्रतिनिधींना झूम अ‍ॅपद्वारे प्रशिक्षण देतील. गाव पातळीवर 1 ते 3 ऑगस्ट या कालावधीत गाव कृती आराखड्याच्या अनुषंगाने लागणारी माहिती कोबो टूल साधनाचा वापर करून संकलित करण्यात येईल. 5 ते 7 ऑगस्टदरम्यान प्राप्त माहितीवरून गाव कृती आराखड्याची निर्मिती व गाव कृती आराखडा पडताळणी प्रक्रिया करण्यात येऊन 15 ऑगस्ट 2021 रोजी होणार्‍या ग्रामसभेमध्ये मंजुरीकरिता कार्यक्रम पत्रिकेवर ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गाव कृती आराखडा पंधरवड्यात जिल्हा कक्षातील तज्ज्ञ/सल्लागार तालुका पातळीवरील गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, पंचायत उपअभियंता, शाखा अभियंता गावपातळीवर ग्रामसेवक, जलसुरक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी सहभाग घेऊन गाव कृती आराखडा अभियान यशस्वीरित्या राबवावे.
डॉ. ज्ञानदा फणसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा व स्व)

Exit mobile version