| खरोशी |प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील खरोशी येथे शनिवारी आणि रविवारी (दि.5) झालेल्या मुसळधार पावसामुळे खरोशी दुरशेत येथील बाळगंगा नदीने रुद्र रूप धारण केले असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. परिणामी गावातील 70 ते 80 घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्यामुळे घरांचे त्याचबरोबर घरातील वस्तूंचे नुकसान झाले आहे. परिणामी, मागील वर्षीप्रमाणेच यावर्षीही महापूर झाल्यामुळे घरात पाणी घुसले. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावातील एका घरावर दरड कोसळून भिंतीला तडा गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर एका घरावर मोठे झाड कोसळून त्यांच्याही घराचे नुकसान झाले आहे. सरपंच रूपाली महेश पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य व इतर गावातील ज्येष्ठ मंडळी या सर्वांवर लक्ष ठेवून असून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करत आहेत. ज्या ज्या घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले आहे, अशा घरातील सर्व अबालवृद्धांना घराबाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती सरपंच रूपाली पाटील यांनी दिली.
