वेदांता गुजरातमध्ये गेलाच कसा

उद्धव ठाकरेंचा सवाल

| मुंबई | प्रतिनिधी |

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये जात असताना सध्याचं राज्य सरकार काय करत होतं असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. फॉक्सकॅान प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना भवनमध्ये झालेल्या पदाधिकारी बैठकीत राज्य सरकारवर टीका केली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतिर्थावरच होणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, गुजरात महाराष्ट्राचा लहान भाऊ आहे. त्यांच्याकडे प्रकल्प गेला, पण राज्य सरकार त्यावेळी काय करत होतं? दोन महिन्यात फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? वेदांता आणि फॉक्सकॅान सारख्या कंपन्या राज्याबाहेर गेल्यामुळे राज्याचं नुकसान झालं आहे. सत्ताधार्‍यांनी याचं आत्मपरीक्षण करावं.

मेळावा शिवतीर्थावरच
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थवर होणार की नाही याबाबत संभ्रम असताना उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीत यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, यंदाचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार. त्याबद्दल कोणताही संभ्रम ठेवू नका. त्यासाठी मुंबई महापालिकेमध्ये रिमांइंडर अर्जही देण्यात आला आहे. शिवसेनेचा 21 तारखेला पदाधिकारी मेळावा होणार आहे. त्यासाठीही शाखा स्तरावर बैठका घेण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

Exit mobile version