काशिद समुद्राकिनारी चाललंय तरी काय?

किती जणांचा जीव घेणार; प्रशासन कधी जागे होणार ?

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड पर्यटन क्षेत्रामधील एक म्हणजे काशिद समुद्रकिनारा. हा समुद्रकिनारा जगाच्या नकाशावर एक सुंदर पर्यटन क्षेत्र म्हणून नावारुपाला आला. याठिकाणी शनिवार व रविवार शेकडो पर्यटक देश-विदेशातून येऊ लागले. परंतु, हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी मौत का कुवाँ बनत आहे. परंतु, प्रभावी उपाययोजनांच्या बाबतीत संबंधित प्रशासन ढीम्म असल्याचे दिसून येत आहे. अजून किती जीव घेणार, असा प्रश्न प्रशासनास विचारण्यात येत आहे.

काशिद समुद्रकिनारी दि.26 रोजी पुणे चिंचवड येथील मुद्यसर इम्तियाज शेख (37) यांचा, तर याआधी दि.17 ला पुण्यातील जुनेद अतिक शेख (21) या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सलग दोन आठवड्यात या घटना घडल्याने याला जबाबदार कोण? पर्यटकांचा आततायीपणा की प्रशासनाचा नाकर्तेपणा, असा प्रश्न पुढे आला आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेतेची जबाबदारी मेरीटाईम बोर्ड व स्थानिक ग्रामपंचायतीने उचलून योग्य त्या खबरदारीसाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे मत मुरुडकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. जर तात्काळ या गंभीर घटनांकडे लक्ष देऊन उपाययोजना केल्या नाही तर अशा घटना घडतच राहतील, असे बोलले जात आहे.

आतापर्यंत या समुद्रात 118 पर्यटकांचा पोहतेवेळी बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तरीपण प्रशासनास जाग येत नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. आता तरी मेरीटाईम बोर्ड, ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाने जागे व्हावे, अशी मागणी पुढे येत आहे. कठोर नियम बनवून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्यास भविष्यातील दुर्घटना टाळता येतील. तसे झाल्यास हे पर्यटन क्षेत्र टिकेल, अन्यथा एकही पर्यटक या ठिकाणी फिरकणार नाही. त्याचा परिणाम स्थानिक व्यवसायावर होऊन अनेक संसार उद्ध्वस्त होतील.

ग्रामपंचायतीमार्फत सध्या समुद्राकिनारी तीन जीवरक्षक तैनात असून, सध्या परिस्थिती पाहता त्यांची संख्या वाढवावी लागणार आहे. ही संख्या दहापर्यंत करणार आहोत, जेणेकरून पर्यटकांचा जीव वाचवता येईल. पर्यटकांचा सुखाचा प्रवास, हाच आमचा ध्यास.

संतोष राणे, सरपंच
Exit mobile version