रायगडचे 93.69 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
। रायगड । जिल्हा प्रतिनिधी ।
विद्यार्थ्यांच्या पुढील करिअरची दिशा ठरविणाऱ्या बारावी (HSC) परीक्षेचा निकाल शनिवारी (दि.2) ऑनलाईन जाहीर करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील 93.69 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालात मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली असून, मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 96.13 टक्के तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 91.22 टक्के इतके आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी, मार्च 2026मध्ये इयत्ता बारावीची परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेचा निकाल शनिवारी मंडळाच्या संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला. बारावीच्या परिक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून 30 हजार 558 विद्यार्थ्यानी अर्ज भरले होते. त्यापैकी 30 हजार 470 विद्यार्थी परिक्षेला सामोरे गेले. यामधील 28 हजार 549 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात सर्वात जास्त निकाल 97.11 टक्के श्रीवर्धन तालुक्याचा लागला असून, सर्वात कमी 85.02 टक्के निकाल खालापूर तालुक्याचा लागला आहे.
शाखानिहाय जिल्ह्याचा निकाल :
विज्ञान शाखा: 98.57 टक्के
कला शाखा: 86.03 टक्के
वाणिज्य शाखा: 91.29 टक्के
किमान कौशल्य शाखा: 89.59 टक्के
तंत्रविज्ञान: 92.40 टक्के
तालुकानिहाय निकाल (टक्केमध्ये)
पनवेल 94.73, उरण 94.03, कर्जत 96.31, खालापूर 85.02, सुधागड 88.44, पेण 93.94, अलिबाग 95.39, मुरूड 88.46, रोहा 94.29, माणगाव 93.51, तळा 96.69, श्रीवर्धन 97.11, म्हसळा 96.31, महाड 92.73, पोलादपूर 88.84 टक्के.
