सुधागडातही भातशेतीचे प्रचंड नुकसान

शेतकर्‍यांची नुकसान भरपाईची मागणी
पाली | वार्ताहर |
गुलाब चक्रीवादळाचा फटका पाली सुधागड रायगडसह कोकणातील शेतकर्‍यांना बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास शेतकर्‍यांच्या तोंडातून गळून पडला आहे. ठिकठिकाणी भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुधागडातील शेतकर्‍यांच्या भातपिकांची नासाडी झाली असून, प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी केली आहे.
येथील शेतकरी रडकुंडीला आला आहे. कोकणात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे, याचाही मायबाप सरकारने विचार करावा, अशी विनंती करण्यात आली आहे. यावेळी रायगड जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हरिश्‍चंद्र शिंदे म्हणाले की वादळ व अतिवृष्टी ने शेतकरी पूर्णपणे देशोधडीला लागत आहे. शेतकर्‍याला जगविण्यासाठी शासनाने औद्योगिक तत्वावर कृषी धोरणे व उपाय योजना करणे गरजेचे आहे, असे शिंदे म्हणाले.
निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते वादळ, फयान वादळ, अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त झाला, सलग दोन वर्षांपासून शेतकर्‍यांवर अस्मानी संकट ओढवले आहे. भात पीक, घर, शेती, बागा यांचे प्रचंड नुकसान झाले, या संकटातून सावरत नाही तोच अवकाळी व अतिवृष्टीच्या पावसाने भातशेतीचा पुन्हा घात केला. आठवडाभर झालेल्या पावसाने पीक मातीमोल झाले. पेरणी व कापणीचा खर्च ही निघणार नाही, अशी अत्यंत बिकट अवस्था शेतकरी वर्गाची झाली आहे. जगावे की मरावे या द्विधामनःस्थितीत असलेल्या शेतकर्‍याला शासन मदतीची अपेक्षा आहे. या संकटाच्या काळात जिल्ह्यातील बळीराजाला सरकारकडून मदत मिळावी अशी मागणी जोर धरत आहे.

Exit mobile version