हजारोंच्या संख्येने सामील व्हा: शेकाप नेते जयंत पाटील
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
निवडणूक आयोगाविरोधात शनिवारी (दि.1) मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. महाविकास आघाडीसह मनसेचे असंख्य कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार आहेत. शेतकरी कामगार पक्षाचादेखील या मोर्चात सहभाग असणार आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने या मोर्चात सामील व्हा, असे आवाहन शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले आहे.
राज्यातील मतदार याद्यांच्या घोळाबाबत मागील काही दिवसांपूर्वी शेकापसह महाविकास आघाडी व मनसेच्या प्रमुख मंडळींनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. सदोष मतदार याद्या दुरुस्त करून त्या अद्ययावत करा, अशी मागणी त्यावेळी केली होती. परंतु, त्याची कार्यवाही अद्याप झाली नसल्याने महाविकास आघाडी, मनसेच्यावतीने महामोर्चा काढण्यात येणार आहे. सदोष मतदार याद्या दुरुस्त करून अद्ययावत केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका, या मागणीसाठी शनिवारी (दि.1) महाविकास आघाडी- मनसेच्यावतीने विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. मुंबईतील फॅशन स्ट्रीट चर्चगेट ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा असणार आहे. महाराष्ट्रातील डावे पक्ष हे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असून, या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी राहण्याचा निर्णय डाव्या पक्षांनी घेतला आहे.
मतदार याद्यांमधील घोळाबाबत निषेध व्यक्त करण्याबरोबरच हक्क आणि अधिकार वाचविण्यासाठी शेतकरी कामगार पक्षदेखील या विराट मोर्चात सहभागी होणार आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील चिटणीस मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, तालुका चिटणीस, तालुक्यातील सर्व सेलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व कार्यकर्ते यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले आहे. मोर्चाच्या ठिकाणी फॅशन स्ट्रीट चर्चगेट येथे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे.






