नागावकर परिवाराची शंभर वर्षांची परंपरा कायम

| खांब | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील धार्मिक तथा अध्यात्मिक क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र तळवली तर्फे अष्टमी या गावातील नागावकर परिवाराने पिढ्यान्‌‍पिढ्या जवळपास शंभर वर्षांची आपली गणपती व्यवसायाची परंपरा जतन करून ठेवली आहे. आज या व्यवसायात त्यांची चौथी पिढी कार्यरत आहे. या परिवारातील स्व.कोंडाजी नागावकर हे उत्तम मूर्तीकार,चित्रकार म्हणून नावारुपास आले होते.त्यांनी त्यावेळी आपल्या हयातीत तालुक्यास जिल्ह्यातील विविध गावात स्वतःच्या हाताने बनविलेल्या पाषाणाच्या मूर्ती आजही काही गावामध्ये पहावयास मिळत आहेत. पुढे हिच कला त्यांच्या पुढील पिढीतील ह.भ.प.स्व.परशुराम नागावकर ह.भ.प.स्व.तुकाराम नागावकर, ह.भ.प.स्व.यशवंत नागावकर, ह.भ.प.रामकृष्ण नागावकर, ह.भ.प.चंद्रकांत नागावकर, विठोबा नागावकर,सदानंद नागावकर यांनी टिकून ठेवली आहे. तर स्व.ह.भ.प.कोंडाजी नागावकर यांचे सारेच कौशल्य त्यांनी अंगी बाणवून अगदी कठिण परिस्थितीत आपल्या पिढीचा पिढीजात व्यवसाय टिकवून ठेवला. आजच्या परिस्थितीत त्यांची चौथी पिढी ही या व्यवसायात कार्यरत आहे. नागावकर परिवारांनी तयार केलेल्या गणेश मूर्तींना केवल रोहे तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभरात मोठी मागणी असते. जास्तीत जास्त पर्यावरणपुरक गणेश मूर्ती बनविण्याकडे नागावकर परिवाराचा कल असल्याचे दिसून येत आहे.

गणेश सजावट स्पर्धांची रेलचेल

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक गणेश सजावटी गणेश उत्सवात केल्या जातात. त्यामुळे अशा कलावंतांना घरगुती गणेश सजावट आणि पर्यावरण पूरक गणेशमूर्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. आगामी वर्षे निवडणुकीचे वर्षे असल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणात स्पर्धा आयोजित झाल्या असून, स्पर्धांची रेलचेल यावर्षीच्या गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन, शिवसेना ठाकरे गटाचे वतीने पर्यावरण पूरक सजावट आणि पर्यावरण पूरक सजावटीसाठी कर्जत तालुक्यासाठी हि स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या युवा प्रतिष्ठानकडून या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. नेरळ येथे शिवसेना शिंदे गटाचे वतीने नेरळ शहर मर्यादित घरगुती गणेश सजावट आणि गणेश मूर्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहर प्रमुख प्रभाकर देशमुख यांनी हि स्पर्धा जाहीर केली आहे. तर नेरळ ग्रामपंचायत कडून सालाबादप्रमाणे घरगुती गणेश सजावट स्पर्धा आणि गणेश मूर्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे.

माथेरान मध्ये माथेरान गिरीस्थान नगरपरिषद यांच्या वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत इको फ्रेंडली गणेश सजावट स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.पर्यावरण पूरक मूर्ती,पर्यावरण पूरक गणेश सजावट आणि कृत्रिम तलावात गणेश मूर्तीचे विसर्जन तसेच निर्माल्य पासून खत निर्मिती करणाऱ्या गणेश भक्तांना या स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. तर माथेरान प्रेस क्लब यांच्या माध्यमातून स्व संतोष पवार स्मृती सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे.त्याचवेळी गावोगावी अशा स्पर्धा आता भरविल्या जात असून पर्यावरण पूरक गणेश सजावटी यांना प्राधान्य देण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन कर्णयचे शासनाचे आवाहन असल्याने अशा स्पर्धांची रेलचेल सगळीकडे दिसून येत आहे.

‌‘सणासुदीत वीजपुरवठा सुरळीत ठेवा’

| चिरनेर | वार्ताहर |

ऐन सणासुदीच्या म्हणजे गणेशोत्सव अगदी एका दिवसांवर येऊन ठेपला असून, श्री गणरायाच्या मूर्ती घडविणारे मूर्तिकार सध्या रंगकामात गुंतले आहेत. त्यांना स्प्रेद्वारे शेडिंगचे रंगकाम करताना विजेविना मोठी समस्या निर्माण होत असून, येथील मूर्तिकारांच्या रंगकामात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे कामाचा खोळंबा होत आहे .मूर्तिकारांचे रंगसंगतीचे महत्वपूर्ण काम अगदी हातघाईवर आले असून, त्यांना हे असे लपंडाव खेळणारे विजेचे विघ्न, त्रासदायक ठरत असल्याचे चित्र सध्या चिरनेर कलानगर येथे पहावयास मिळत आहे. महावितरण कंपनीने गणेशोत्सवात हा भोंगळ कारभार सुधारावा, अशी मागणी चिरनेर येथील सर्व मूर्तिकारांकडून केली जात आहे.

दरम्यान चिरनेरच्या कलानगर मधील गणपती कारखान्यात सध्या युद्धपातळीवर काम सुरू आहे. मात्र या विजेच्या लपंडावामुळे कामात अडथळे येत असल्यामुळे मूर्तिकार त्रासले आहेत. वीज पुरवठ्याअभावी सर्वच कामे ठप्प होत असल्याने, मोठी गैरसोय होत आहे. चिरनेर, कोप्रोली, आवरे खोपटे, वशेणी,पिरकोन, सारडे, पाले तसेच या विभागातील अन्य भागात विज नाही असा दिवस कॅलेंडर मधून शोधावा लागेल, अशी येथील स्थिती आहे .निदान सणासुदीच्या या दिवसात तरी विजपुरवठा नियमित करून हा लंपडाव थांबवावा. दरम्यान खेड्यापाड्यातही वीज ही जीवनाशक गोष्ट झालेली आहे. फार वर्षांपूर्वी दोन-तीन महिन्यांनी येणारी लाईट बिले आता दरमहा येऊ लागली आहेत. वीजकर, मीटरभाडे व इतर आकार यामुळे ग्रामीण भागातील जनता वीजबिलाद्वारे तिप्पट रक्कम अदा करत आहे. तरीही अखंड वीज मिळण्याचे स्वप्न ग्रामीण जनतेला पाहायला मिळत नाही.

गणेशोत्सव आरास स्पर्धेचे आयोजन


| पेण | प्रतिनिधी |

गर्जा रायगड परिवाराकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याचा सोप्पा आणि सरळ मार्ग असून फक्त आपल्या बाप्पांच्या सजावटीचा फोटो काढायचा आणि आयोजकांनी दिलेल्या व्हॉट्‌‍सॲप नंबरवर पाठवायचा. या स्पर्धेसाठी काही अटी दिलेल्या आहेत. त्या म्हणजे बाप्पांची आरास ही पर्यावरण पूरक असावी. कोठेही थर्माकोलचा अथवा प्लॅस्टिकचा वापर नसावा. छायाचित्रामध्ये कोणत्याही प्रकारची एडेटींग केलेली नसावी. छायाचित्रासोबत आपले नाव व पत्ता आवश्यक आहे. हे छायाचित्र 22 सप्टेंबरपर्यंत रात्री 12 वाजेपर्यत पाठवायचे आहेत. प्रथम तीन विजेत्यांना आकर्षक सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देण्यात येईल. स्पर्धकांनी 7798266800, 9028285262 व 8446150414 या व्हॉट्सॲप नंबरवर आपले गणपती बाप्पाचे छायाचित्रे पाठवायचे आहेत, असे आवाहन गर्जा रायगडचे संपादक संतोष पाटील यांनी एका प्रसिध्द पत्रकान्वये केले आहे.

चाकरमान्यांसाठी रायगड विभागातून 60 बसेस

| मुरूड जंजिरा | वार्ताहर|

गणेशोत्सवाचे सूर वाजू लागले आहेत. गणेशोत्सवासाठी मुंबई- पुण्यातील चाकरमानी येण्यास सुरुवात झाली आहे. गणेशभक्त चाकरमानी मंडळीना गावाकडे आणण्यासाठी रायगड विभागाकडून 60 एस टी बसेस मुंबईकडे मार्गस्थ झाल्या असल्याची माहिती मुरूड आगार व्यवस्थापक नीता जगताप यांनी दिली. मुरूड आगारातून अलिबाग ते मुरूड अशी शटल सेवा सुरू करणार आहोत. अलिबाग ते मुरूड अशा 6 फेऱ्या आधिक असणार आहेत. गणेशोत्सव कोकणातील अत्यंत महत्त्वाचा सण असून रेल्वे, एसटी बसेसदेखील फुल्ल होत आल्या आहेत. रायगडात पनवेलपासून देखील अनेक बसेस जाणार असून, पनवेल ते अलिबाग विना थांबा बस सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवातील घरची स्वच्छता आणि पूर्वतयारीसाठी चाकरमानी येण्यास मोठ्या संख्येने सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.

उरण बाजारपेठ सजली


| उरण | वार्ताहर |

लाडक्या बाप्पाच्या आगमनाला दोन दिवसांचा अवधी राहिला आहे. सर्वच ठिकाणी आरास सजावटीची जोरदार तयारी सुरू आहे. मनातील कल्पनाशक्तीला वाव देऊन वेगवेगळ्या पद्धतीची आरास करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न आहे.

बाप्पाला लागणारी सुगंधी अगरबत्ती ,धूप ,कापसाच्या वाती ,रेगीत लाईट ची तोरणे ,शोभेच्या वस्तू ,,व वेगवेगळ्या नावाने सुगंधी धूप ,अगरबत्ती ने दुकाने सजली आहेत . अशात बाजारात सध्या आर्टिफिशिअल फुलांच्या माळा विक्रीसाठी आल्या असून, उरणच्या बाजारपेठामध्ये अशा विविध रंगांतील फुलांच्या हुबेहूब वाटणाऱ्या माळा अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. अगदी तीन फुटांच्या माळांपासून 1 ते 8 फुटांच्या माळांपर्यंत झेंडूचे हार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तीन फुटांच्या तोरण अथवा हारासाठी पन्नास ते दीडशे रुपयांपासून सुरुवात होते.

विविध सुवासाच्या अगरबत्ती, 4 फुट लांब अगरबत्तीला खूप मागणी आहे .सुप्रसिद्ध असलेली मानकी अगरबत्तीचा सुगंध गणेशभक्तांना आवडतो, त्यामुळे मानकी अगरबत्तीस खूपच मागणी असते. संध्याकाळी अगरबत्ती खरेदी करण्यासाठी खूपच गर्दी असते, असे अगरबत्ती विक्रेते मनन पटेल यांनी सांगितले .

माणगावात गणेशोत्सवाची लगबग


| माणगाव | प्रतिनिधी|

तमाम नागरिकांचे दैवत असलेल्या आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. माणगाव बाजारपेठ खरेदीसाठी मखर, वेगवेगळ्या प्रकारच्या सजावटीसाठी खरेदी करण्यासाठी धूम वाढली आहे. एका दिवसावर गणेशोत्सव ठेपला असून, माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील 16 सार्वजनिक गणेशोत्सव तर 8714 घरगुती गणपती व 12698 गौरी प्रतिष्ठापना होणार आहे.
माणगाव तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यंदाचे वर्षी सार्वजनिक 16 गणपती पैकी दोन गणपती पाच दिवसाचे असणार आहेत. उर्वरित 14 सार्वजनिक हे अनंत चतुर्थीपर्यंत असणार आहेत. त्याचबरोबर 8714 घरगुती गणपती पैकी 2506 गणपती दीड दिवसाचे तर 5452 घरगुती गणपती 5 दिवसांचे असणार आहेत. 756 घरगुती गणपती 10 दिवसाचे असणार आहेत. माणगाव तालुक्यात गणेशोत्सवाची मोठी उलाढाल सुरु असून आपल्या लाडक्या गौरी – गणरायाच्या दर्शनासाठी गणेशभक्त आतुरलेला आहे. गणपती विसर्जनासाठी दरम्यानच्या काळात कोणतीही घटना घडू नये म्हणून माणगाव काळ नदीवर गणपती घाट परिसरात माणगाव नगरपंचायत व पोलिसांतर्फे विशेष काळजी घेतली जाणार आहे.

Exit mobile version