70 हून अधिक महिलांचा समावेश; पोलिसांकडून कसून चौकशी सुरू
| पनवेल | प्रतिनिधी |
नवी मुंबईतील खारघर भागात बुधवारी पोलिसांनी मोठी कारवाई करत 102 संशयित बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्यांमध्ये 70 हून अधिक महिला आहेत, ज्या परिसरातील वेगवेगळ्या घरांमध्ये घरकामगार म्हणून काम करत होत्या. या संबंधित संशयितांची ओळख, निवासस्थान आणि त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे यांची तपशीलवार पडताळणी पोलीस पथकाकडून करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यासह मानवी तस्करी विभागाचे अधिकारी संबंधित संशयितांची पार्श्वभूमी शोधण्यावर भर देत असून, त्यातील किती जण प्रत्यक्षात बेकायदा मार्गाने शहरात आले आहेत, याबाबत तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
या कारवाईनंतर सोमय्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खारघर येथे सापडलेले 102 संशयित हे घरकाम करणारे व्यक्ती असून, सर्वच मुस्लिम धर्मातील असल्याचे म्हटले आहे. या सर्वांनी आपला कायमस्वरूपी पत्ता म्हणून पश्चिम बंगाल असल्याचे सांगितले. अशी माहिती किरीट सोमय्या यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. यानंतर पोलिसांकडून सर्व संशयितांची तपासणी करण्यात येत आहे. पोलिसांकडून संशयितांना ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. मात्र, सर्व संशयितांचा तपास अद्याप सुरू असून सर्व तपासा अंतीच योग्य निष्कर्ष काढता येईल, असे खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांनी सांगितले आहे. या प्रकरणामुळे खारघर परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.







