ठेकेदारांचा सिडको-जेएनपीएला शेकडो कोटींचा चुना

फुकटच्या डेब्रिजचा साडेबारा टक्के भूखंड भरावासाठी वापर

| चिरनेर | वार्ताहर |

जेएनपीए प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के विकसित भूखंड वाटपासाठी सुरू असलेल्या 111 हेक्टर क्षेत्रात भराव करण्यात आला आहे. यासाठी ठेकेदारांनी माती, मुरुम, दगडांऐवजी फुकट मिळणाऱ्या टाकाऊ डेब्रीजचा मोठ्या प्रमाणावर वापर करून सिडको-जेएनपीएला शेकडो कोटींचा चुना लावला आहे. ठेकेदारांकडून होणाऱ्या या फसवणुकीच्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सिडको-जेएनपीएला धारेवर धरुन भरावासाठी वापरण्यात आलेले टाकाऊ डेब्रिज काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे ठेकेदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

सिडकोने जेएनपीए बंदरासाठी नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा, जसखार, सोनारी, बेलपाडा, पाणजे, डोंगरी, फुंडे आदी गावांतील सुमारे तीन हजार शेतकऱ्यांची 2700 हेक्टर जमीन संपादन केली आहे. संपादन केलेल्या जागेपोटी खातेदार असलेल्या तीन हजार शेतकऱ्यांच्या 12 हजार वारसांना जेएनपीएने 34 वर्षांनंतरही साडेबारा टक्के विकसित भूखंडाचे वाटप केलेले नाही. भूखंड वाटपासाठी 145 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. मात्र, जेएनपीएने काही गावांना गावठाण विस्तारासाठी जमीन दिल्याचे कारण पुढे करून साडेबारा टक्के विकसित भूखंड वाटपासाठी फक्त 111 हेक्टर जमीन जमीन आरक्षित केली आहे.

जेएनपीएने साडेबारा टक्के विकसित भूखंड वाटप करण्यासाठी रांजणपाडा, जासईदरम्यान आरक्षित करण्यात आलेल्या 111 हेक्टर क्षेत्रावर भराव सुरू केला आहे. या कामासाठी 379 कोटी रुपये खर्चाची तरतूदही जेएनपीएने केल्यानंतर भरावाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, ठेकेदारांनी माती-मुरुम-दगडाच्या भरावाऐवजी चक्क मुंबई, नवी मुंबईतून फुकटात मिळणाऱ्या टाकाऊ डेब्रिजचा वापर केला आहे. हे टाकाऊ डेब्रिज फुकटात तर मिळतेच, त्याशिवाय उलट एका डंपरमागे 200 ते 300 रुपये डेब्रिज टाकणाऱ्यांकडून दिले जातात.

अशाप्रकारे ठेकेदारांनी एकीकडे सिडको-जेएनपीएकडून भरावाचे, तर दुसरीकडे फुकटात मिळणाऱ्या टाकाऊ डेब्रिजचा वापर आणि त्यापोटी मिळणारे पैसे अशी दुहेरी कमाई करुन कोट्यवधी रुपयांचा चुना लावला आहे. सिडको-जेएनपीए फसवणूक करून कोट्यवधींची कमाई केली आहे. ही गंभीर बाब निदर्शनास आल्यानंतर आणि याविरोधात जेएनपीए आणि संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या तक्रारींनंतर भरावाचे काम सिडकोने मे 2023 पासूनच बंद केले असल्याची माहिती जेएनपीए कामगार विश्वस्त रवींद्र पाटील यांनी दिली आहे.

टाकाऊ डेब्रिजचा भरावासाठी वापर केल्याने जेएनपीएने पुनर्वसन केलेल्या वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा गावासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. टाकाऊ डेब्रिजच्या वापरामुळे ठेकेदार गब्बर होत असले तरी भरावाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. याबाबत पुराव्यानिशी सिडकोकडे तक्रारी केल्या असून, कारवाईची मागणी करण्यात आली असल्याची माहिती माजी जेएनपीए कामगार विश्वस्त भूषण पाटील यांनी दिली.

Exit mobile version