। उरण । प्रतिनिधी ।
अचानकपणे निर्माण झालेल्या वादळीवाऱ्यामुळे तीन दिवसांपूर्वी खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटी अर्ध्या वरून परतल्या आहेत. दरम्यान मुंबई पासून काही अंतरावर उरण परिसरातील एक मासेमारी बोट बुडाली असून, यातील खलाशाना वाचविण्यात यश आले आहे. या हंगामात ही नववी वेळ असून वादळामुळे मच्छीमारांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.
समुद्र खवळल्याने धोक्याचा इशारा देणारा बावटा लावण्यात आला आहे. त्यामुळे मासेमारीसाठी रवाना झालेल्या बोटींना माघारी परतावे लागले आहे. यातील 250 पेक्षा अधिक बोटी करंजा बंदरात तर 180 पेक्षा अधिक बोटींनी कोकणातील विविध बंदरात नांगर टाकला आहे. या वादळीवाऱ्यामुळे मासेमारीसाठी अर्ध्या समुद्रात गेलेल्या बोटी परत आल्या आहेत. या फेरीसाठी बर्फ खर्च करण्यात आलेल्या तीन लाखापेक्षा अधिकचा खर्च वाया गेला आहे. त्यामुळे या वादळीवाऱ्यानी मच्छिमारांचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे उपवासाचे दिवस संपल्याने मासळीच्या मागणीत वाढ झाली आहे. पावसाळ्यात 60 दिवस मासेमारी बंद होती. 1 ऑगस्टपासून पुन्हा हंगाम सुरू झाला. मात्र खराब हवामान, विविध वादळांमुळे हवामान विभागाने आठवेळा धोक्याचा इशारा दिला. किमान 20-22 दिवस मासेमारी बंद ठेवावी लागली होती. यादरम्यान मासळीची आवक कमी झाल्याने भाव गगनाला भिडले होते.






