जिल्ह्यात शेकडो बेकायदेशीर शाळा

पनवेल तालुक्यात सर्वाधिक 37 शाळांचा समावेश

। रायगड । खास प्रतिनिधी ।

जिल्ह्यात 2024-25 असे नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. यासाठी विविध शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. बोगस अथवा अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेण्यापासून पालकांना रोखण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने अशा शाळांवर वक्रदृष्टी केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात सुमारे 100 हून अधिक शाळा अनधिकृत असल्याचे बोलले जात असून, शिक्षणाचा खेळखंडोबा समोर आला आहे. पैकी एकट्या पनवेल तालुक्यात 37 शाळा असल्याचे उघड झाले आहे. विशेष बाब म्हणजे, या बोगस शाळांवर कारवाई करण्याचे थेट अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी संबंधित गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहेत.

शाळा म्हणजे संस्काराचे मंदिर समजले जाते. मात्र, शाळा चालविणाऱ्या विविध कॉर्पोरेट संस्थांसह व्यावसायिकांनी सर्वत्र शाळांचे बाजारीकरण चालविले आहे. यामध्ये जादा दराने शुल्क आकारणे, शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणे, शाळांमध्ये गणवेश, शैक्षणिक साहित्य विकणे, शाळा चालविणाऱ्या संस्थाचालकांची मनमानी असे अनेक प्रकार घडतात. त्या अनुषंगाने शासनासोबत प्रशासकीय पातळीवर अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन शासनाने शाळा तपासणी मोहीम हातात घेतली. या शाळा तपासणी मोहिमेमध्ये अनेक धक्कादायक आणि आश्चर्यकारक खुलासे बाहेर आले आहेत.

अनेक शाळा शासनाची परवानगी न घेताच चालवल्या जात आहेत. त्यामुळे शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली होते. अशा शाळांना शासनाने कायमस्वरूपी टाळे ठोकण्याचे धोरण आखले आहे. त्या दृष्टीने डॉ. भारत बास्टेवाड यांनी जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी यांना या नियमबाह्य अनधिकृत शाळा बंद करून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पूर्वी गटशिक्षणाधिकारी अनधिकृत शाळांचा अहवाल प्रशासनाला पाठवत होते. आता मात्र, कारवाई करण्याचे अधिकार गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहेत. यासंबंधीचे पत्र डॉ. बास्टेवाड यांनी 24 जानेवारी रोजीच काढले आहे. यासंबंधी पालकांनाही अनधिकृत शाळेसंदर्भात सजग केले जात आहे.

जिल्ह्यात सुमारे 100 हून अधिक शाळा अनधिकृत असण्याची शक्यता आहे. पनवेल तालुक्यातील अनधिकृत शाळांची यादी पनवेलचे गटशिक्षणाधिकारी एस.आर. मोहिते यांनी जाहीर केली आहे. त्यानुसार पनवेल तालुक्यात प्राथमिक 23, तर माध्यमिक विभागाच्या सात अशा एकूण 30 शाळा अनधिकृत असल्याचे दिसून येते. तसेच बंद असलेल्या आणि सुरू होण्याची शक्यता असलेल्या सात शाळांचा समावेश आहे. सरकारची मान्यता नसतानाही पनवेलसह अन्य 14 तालुक्यांमध्ये अनधिकृत शाळा सुरू असल्याचे बोलले जाते. लवकरच गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत याबाबतचा अहवाल प्रशासनाला प्राप्त होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या शाळांनी शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन केल्याने त्या कारवाईच्या कचाट्यात सापडल्या आहेत.

सरकारच्या नियमानुसार भौतिक सुविधा उपलब्ध नसणे, शाळेच्या दर्शनी भागावर शाळा मान्यता क्रमांक, संलग्नता क्रमांक, युडायस क्रमांक प्रदर्शित केले नसल्याचेही दिसून आले आहे. या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी तसेच मुलांचा प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

डॉ. बास्टेवाड यांच्या पत्रात काय
स्वयं अर्थसहायित तत्त्वावर नवीन शाळा स्थापन करण्यात येत आहेत. मात्र, यासाठी सरकारची कोणतीच मान्यता न घेताच शाळा सुरु करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. अनधिकृत शाळा सुरु राहिल्यास यापुढे गटशिक्षणाधिकारी यांना व्यक्तीशः जबाबदार धरण्यात येईल, तसेच त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. अशा अनधिकृत शाळांची पडताळणी करुन संबंधीतांवार फौजदारी कारवाई करुन शाळा बंद करावी. यासाठी गटशिक्षणाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे, असे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी 24 जानेवारीच्या पत्राद्वारे गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहेत.
शाळा अनधिकृत का?
सरकारची मान्यता नसणे, विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी कागदपत्रे जमा करणे, अधिकार नसताना पालकांकडून शुल्क वसूल करून आर्थिक गैरव्यवहार करणे, शासकीय नियमांचे पालन न करणे, विद्यार्थ्यांची अनधिकृतरित्या पटावर नोंदणी करणे, अन्य शाळांकडून नियमबाह्यरित्या दाखला मागणी करणे.
बेकायदेशीर प्राथमिक शाळा
मार्शमेलोज इंटरनॅशनल स्कूल ओवे, केळसेकर इंग्लिश मीडियम स्कूल तळोदा पाचनंद, अर्कम इंग्लिश स्कूल तळोजा, ओसीन ब्राईट कॉन्व्हेंट हाय तळोजा, ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल कळंबोली, सेंट जोहान्स इंटरनॅशनल स्कूल कोळखे, साई गणेश एज्युकेशन सोसायटीची लाटे विनायक केशव जोशी मेमोरियल नवजीवन इंटरनॅशनल स्कूल टोल नाका, रोहिजण इंग्लिश स्कूल रोहिजण, आकृती एज्युकेशन अँड वेल्फेअर सी एस एम बी इंटरनॅशनल स्कूल उलवे, डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई, बजाज इंटरनॅशनल स्कूल तळोजा, प्लीझंट इंग्लिश स्कूल नेरेपाडा, न्यू इंग्लिश स्कूल नेरे, एस.एम.बी इंटरनॅशनल स्कूल तळोजा पाचनंद, दि वेस्ट हिल्स इंटरनॅशनल स्कूल तळोजा पाचनंद, लिटिल जीनियस स्कूल तळोजा पाचनंद, ब्राईट इंटरनॅशनल स्कूल तळोजा पाचनंद, टीनी लँड स्कूल रोहिंजण, ब्राईट इंटरनॅशनल स्कूल रोहिजण, माय छोटा स्कूल तळोजा, सेंट अँड्रूज स्कूल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाकडी, किड्स गार्डन पब्लिक स्कूल टेमघर, कोठारी स्कूल करंजाडे.
बेकायदेशीर माध्यमिक शाळा
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल करंजाडे, गोयंका इंटरनॅशनल स्कूल उलवा, कै. मंजुळा त्रिंबक (साखरेशेठ) ठाकूर इंग्रजी माध्यम शाळा पाले बुद्रुक कोळवाडी, एज्युटेक स्कूल माध्यमिक तळोदा पाचनंद, न्यू इंग्लिश स्कूल कोपरा, ज्ञानाई माध्यमिक विद्यालय धामणी वाजे, सेंट विल्फेड स्कूल सेक्टर 2
अनधिकृत शाळा सन 2023-24 मध्ये बंद झाल्या, परंतु सुरु होण्याची शक्यता असलेल्या वेदगृह इंटरनॅशनल स्कूल, करंजाडे, डॉल्फीन किडस् स्कूल, करंजाडे, एस.जी.टी. इंटर नॅशनल, करंजाडे, प्लीजन्ट इंग्लिश स्कूल, सांगडे, लिटील चॅम्प, ओवळे, दि इंग्लिश स्कूल, उलवा, रायगड इंटरनॅशनल स्कूल, पाचनंद.
Exit mobile version