कंपनी प्रशासनाकडून लेखी आश्वासन; स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथे टाटा कंपनीकडून नव्याने जलविद्युत प्रकल्प बांधला जात आहे. विविध मागण्यांसाठी स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध करीत उपोषण सुरू केले होते. स्थानिकांनी सुरू केलेल्या उपोषणाची सांगता झाली असून टाटा पॉवर कंपनीकडून उपोषणकर्त्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. दरम्यान, टाटा पॉवर कंपनीकडून देण्यात आलेल्या लेखी आश्वासन नंतर स्थानिक ग्रामस्थ आणि प्रकल्पग्रस्त यांनी सुरू केलेले उपोषण स्थगित करण्यात आले.
कर्जतच्या भिवपुरी येथील टाटा पॉवर कंपनीच्या पंप स्टोरेज वीज प्रकल्पाविरोधात प्रकल्पग्रस्त आणि शेतकरी यांनी उपोषण सुरू केले होते. कर्जत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी उपोषणकर्ते आणि टाटा पॉवर प्रकल्प अधिकारी यांच्याशी दोन दिवस वेगवगेळ्या विषयांवर चर्चा केली. त्यानंतर उपोषणकर्ते यांच्या मागण्या मान्य करीत लेखी आश्वासन दिले. अक्षय ऊर्जा आणि स्थानिक विकासासाठी टाटा पॉवर प्रकल्प भविष्यात कटीबद्ध राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. भिवपुरीच्या टाटा कंपनीच्या पंप स्टोरेज जल विद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक गावकऱ्यासाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये भिवपुरी ग्रामपंचायत हद्दीसाठी असलेली जलकुंभ येथे पाणी शुद्धीकरण संयंत्राची उभारणी करून देण्यात येणार आहे. स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या करीता स्थानिक युवकांसाठी त्यांच्या आवडीप्रमाणे आणि कंपनी धोरणानुसार बांधकामाशी संबंधित कौशल्यांवर आधारित व्यावसायिक प्रशिक्षण आयोजित करून रोजगार क्षमतेत वाढ करण्याचे जाहीर करण्यात आले.
प्रकल्पाचे काम सुरू असताना ज्या घरांची पडझड झाली आहे अशा धनगरवाडीमधील घरांना संयुक्त तपासणीनंतर दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले आहे. धनगरवाडीतील 19 कुटुंबांच्या घरांच्या दुरुस्ती केली जाणार आहे. भिवपुरी, मांडवणे आणि हुमगाव येथील सार्वजनिक ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय तसेच शाळांमध्ये सौरदिवे बसविण्यात येतील. विविध गावातील युवा पिढी सुदृढ व्हावी या करिता एक ओपन जिम उभारली जाणार आहे. प्रकल्पाच्या बांधकामामुळे परिसरातील बोअरवेलमधील पाणी गायब झाले आहे, त्या बोअरवेल ची दुरुस्ती केली जाईल तर ग्रामपंचायत कार्यालय आणि रोकडेवाडी-भिवपुरी रस्त्याला जोडणाऱ्या सुमारे दोन किमी रस्त्याच्या दुरुस्ती केली जाईल. अशा अनेक मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असून प्रकल्प ग्रस्त यांनी टाटा कंपनी अधिकारी सोबत झालेल्या बैठकीत लेखी आश्वासन मान्य करीत आपले उपोषण स्थगित केले आहे.







