मुख्याधिकारी अनुप दुरेंनी मध्यस्थी असफल
। खोपोली । प्रतिनिधी ।
खोपोली शहरातील मुकुंद नगर या रहिवासी भागातील नागरिकांना अधिकृत रस्ता मिळत नसल्याने नागरिकांनी एकत्रितपणे उपोषण सुरू केले आहे. संबंधित जागेसाठी येणार्या अडचणीबाबत दिवसभर चौकशी करीत रात्री मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी उपोषणकर्ते राजन सुर्वे आणि ग्रामस्थ, महिलांशी चर्चा केली. यावेळी उपनगराध्यक्षा विनिता कांबळी, नगरसेविका प्रमिला सुर्वे, नगरसेवक नितीन मोरे, कय्युम पाटील, सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार उपस्थित होते. पर्यायी रस्त्यावरून घंटागाडी, रिक्षा, रूग्णवाहिका येईल असा रस्ता सुरू करतो, तसेच प्रमुख मागणी असणार्या रस्त्याचे काम येत्या आठ दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मात्र, ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने उपोषण सुरूच राहिले आहे.
गेल्या 20 वर्षांपासून सर्वे नंबर आठ व हिस्सा नंबर दोन सिटीएस नं. 5348 मधून राहत्या जागेत येण्या-जाण्यासाठी अधिकृत रस्ता नाही. अधिकृत रस्ता मिळण्यासाठी मुकुंद नगरवासियांनी खोपोली परिषदेकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र, त्यांना रस्ता मिळाला नाही. दरम्यान, तत्कालीन नगराध्यक्ष सुमन औसरमल, ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, मुख्याधिकारी गणेश शेट्ये यांनी मध्यस्थी करीत खासगी जागेतून सिलिंडर वाहन, रुग्णवाहिका व शाळा बस, रिक्षा जाण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. परंतु, मागील काही दिवसांपासून हा खासगी जागेतील रस्ता बंद करण्यात आल्याने हक्काचा व कायमस्वरूपी रस्ता मिळावा यासाठी मुकुंद नगरवासी उपोषणास बसले आहेत.
रस्त्यासाठी खोपोलीत रहिवाशांचे उपोषण सुरू
