| दिल्ली | वृत्तसंस्था |
बिहारच्या जमुई जिल्ह्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. एका व्यक्तीने त्याच्या पत्नीसह स्वतःच्या पाच महिन्याच्या मुलीची हत्या केली आहे. ओलयत अन्सारी उर्फ सोनू असे आरोपीचे नाव आहे. मृतांची नावे नसरीन (25) व आलिशा (5 महिने) अशी आहेत. पत्नी व मुलीची हत्या केल्यानंतर अन्सारीने स्वतःचा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालायत उपचार सुरू आहेत. शुक्रवारी (दि.9) रोजी ही घटना घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सोनो पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या बलथर गावात पेलवाजन मुस्लिम टोला इथे हे दुहेरी हत्याकांड घडल्यानं एकच खळबळ उडाली. घरगुती वादातून आरोपीने पत्नी व मुलीची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. शुक्रवारी आरोपीचा पत्नी नसरीनशी काही कारणांवरून वाद झाला. दोघांमधला वाद इतक्या टोकाला गेला, की ओलायत याने पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केला. पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने त्याच्या पाच महिन्याच्या निष्पाप मुलीची देखील हत्या केली. त्यानंतर त्याने चाकूने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस अधिकारी राजेश कुमार, दीनानाथ सिंह यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर जखमी आरोपी अन्सारीला पोलीस बंदोबस्तात उपचारांसाठी शासकीय आरोग्य केंद्र सोनो इथे दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढच्या उपचारांसाठी त्याला जमुईच्या रुग्णालयात हलवण्यात आले. नसरीन व पाच महिन्याच्या मुलीच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी जमुई इथे पाठवण्यात आला आहे. याबाबत पोलीस अधिकारी राजेश कुमार यांनी सांगितले, की ‘या घटनेतल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पोलीस कोठडीत उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.’