| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेलमधील महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर इको चालकाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. दहा दिवसांपूर्वी झालेल्या अत्याचाराबद्दल मुलीने शनिवारी (दि. 15) पालकांना सांगितल्यानंतर सदरचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात आरोपी अमोल पदरथवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आले आहे.
सकाळी कॉलेजला निघालेल्या विद्यार्थिनीला बसस्टॅापवर सोडतो असे सांगून आरोपीने गाडीत बसविले. यानंतर अज्ञातस्थळी गाडी घेऊन जात तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आले. या प्रकारानंतर घाबरलेल्या विद्यार्थिनीने कुटुंबांना सांगितले नव्हते. अखेर शनिवारी सदरची बाब सांगितल्यानंतर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी अमोल पदरथला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता 18 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.