म्हसळा तालूक्यात पतीनेच केली पत्नीची हत्या

। म्हसळा । प्रतिनिधी ।

कोकणात शिमगा अर्थात होळी उत्सवाचा जल्लोष सुरू असताना, म्हसळा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. तालुक्यातील मौजे दगडघूम गावाच्या हदीत असलेल्या धेनू चव्हाण यांच्या चिरा दगड खाणीत काम करणाच्या एका कामगाराने मंगळवारी (दि. 4) आपल्या नवविवाहित पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

बीजापूर येथील मूळनिवासी असलेल्या सतीश चव्हाण आणि त्याची पत्नी निकिता यांचा सात महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. सतीश हा दगडघूम येथील चिरा दगड खाणीत मजुरीचे काम करीत होता. दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याने सतिशने पत्नी निकिताला रागाच्या भरात खानिशेजारील परिसरात नेले आणि तिच्या डोक्यात लाकूड मारून आणि तिच्या चेहऱ्यावर दगड घालून निकिताची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पत्नी निकिता कुठेतरी जंगलात निघून गेल्याचे खोटे सांगून त्याने खाण मालकाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. ही बाब संशयास्पद वाटल्याने खाण मालकाने म्हसळा पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी सतिशची चौकशी केली असता त्याने विसंगत उत्तरे दिल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे.

Exit mobile version