हैदराबादने मारले एका दगडात 3 पक्षी

। नवी दिल्ली । वत्तसंस्था ।

सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पुन्हा एकदा हाय स्कोअरिंग सामना पाहायला मिळाला. या सामन्यात हैदराबादने पुन्हा एकदा तुफान खेळी केली. विशेष बाब म्हणजे पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबादने यावर्षी तिसर्‍यांदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 263 धावांचा विक्रम मोडला आहे. दिल्ली फिरोजशाह कोटला स्टेडियमवर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या नावाचे वादळ पाहायला मिळाले. दोन्ही फलंदाजांनी मिळून केवळ पॉवरप्लेमध्ये 125 धावा ठोकल्या. आणि हैदराबादने दिल्लीला विजयासाठी 267 धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र दिल्लीने हा सामना 67 धावांनी गमावला. विशेष म्हणजे हैदराबादने दिल्लीला हरवून एका दगडात 3 पक्षी मारले आहेत.

पॉइंट टेबलमध्ये हैद्राबादचे स्थान बर्‍यापैकी मजबूत झाले आहे. या सामन्यापूर्वी हैदराबाद 6 सामन्यांपैकी 4 विजयांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर होता, परंतु आता दिल्लीला पराभूत केल्यानंतर 7 सामन्यांपैकी 5 विजयांसह ते थेट दुसर्‍या स्थानावर पोहोचले आहेत. हैदराबादच्या पुढे फक्त राजस्थान रॉयल्स आहे. दुसरीकडे, या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स 7 पैकी 3 सामने जिंकून सहाव्या स्थानावर होती, आता हैदराबादविरुद्धच्या दारुण पराभवानंतर ते सातव्या स्थानावर घसरले आहेत. मुंबई इंडियन्स दिल्लीच्या पुढे सहाव्या स्थानावर आली आहे. अशात हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर दिल्लीलाच नव्हे, तर अन्य दोन संघांनाही मोठा धक्का बसला आहे.

दिल्लीला पराभूत करण्यासोबतच हैदराबादने चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सलाही धक्का दिला आहे. या सामन्यापूर्वी केकेआर दुसर्‍या स्थानावर होता, मात्र आता हैदराबाद दुसर्‍या स्थानावर पोहोचले आहे. केकेआर आता गुणतालिकेत तिसर्‍या स्थानावर घसरला आहे. याशिवाय चेन्नई सुपर किंग्स या सामन्यापूर्वी 7 सामन्यांपैकी 4 विजयांसह तिसर्‍या स्थानावर होते, परंतु आता ते चौथ्या स्थानावर गेली आहे. अशा स्थितीत हैदराबादने दिल्लीबरोबरच केकेआर आणि सीएसकेचेही नुकसान केले आहे.

Exit mobile version