अडीच महिन्याच्या तान्हुल्यासह आ.सरोज अहिरे विधिमंडळात
| मुंबई | प्रतिनिधी |
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आपल्या अडीच महिन्याच्या बाळासमवेत उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले आणि दोघा मायलेकांची आस्थेने विचारपूसही केली. देवळालीच्या आमदार सरोज अहिरे आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी आल्या त्या आपल्या अडीच महिन्याच्या प्रशंसक या बाळासमवेत… याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती मिळताच त्यांनी आमदार आहेर यांची भेट घेऊन त्यांची आणि बाळाची विचारपूस केली.
विधिमंडळात लोकप्रतिनिधी म्हणून कायदे बनवणे आणि विधिमंडळाच्या बाहेर मातृत्वाची जबाबदारी पार पाडणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे. या दोन्ही जबाबदार्या समर्थपणे पार पाडणे म्हणजे म्हणजे स्त्रीमधील कर्तृत्वाचा आणि मातृत्वाचा अनोखा सन्मान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्याच्या विधिमंडळात पहिल्यांदाच अशी घटना घडत असल्याने त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे जाहीर कौतुक केले. यावेळी आमदार सरोज अहिरे यांचे पती डॉ. प्रवीण वाघ आणि सासुबाई कल्पना वाघ उपस्थित होते.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या आमदार सरोज अहिरे-वाघ या अडीच महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन विधान भवनात पोहोचल्या. मी आई आहेच, सोबत आमदारही आहे. त्यामुळे दोन्ही कर्तव्ये महत्वाची आहेत. बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही, सोबत मतदारसंघातील लोकांचे प्रश्नही महत्वाचे आहेत, त्यामुळे बाळाला घेऊन यावे लागले अशा भावना अहिरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
कुटुंबीय बाळाला सांभाळतील त्याचवेळी मी सभागृहात मतदारसंघातील प्रश्न मांडणार आहे. अधिवेशन किती दिवस चालेल माहिती नाही, लोकांचे अधिकाधिक प्रश्न सोडवण्यावर भर राहणार आहे. – आ.सरोज अहिरे