| खोपोली | वार्ताहर |
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी पहाटे सात वाजण्याच्या सुमारास आडोशी उतार येथे वर्हाडाच्या खासगी प्रवासी बसला कंटेनरची जोरदार धडक होऊन अपघात घडला. यात बसचालक संकेत सावंत (वय 30, रा. डोंबविली) याचा मृत्यू झाला. बसमधील 14 प्रवासी जखमी झाले आहेत यातील तीन जण गंभीर जखमी असल्याने त्यांना तातडीने एमजीएम रुग्णालयात व अन्य किरकोळ जखमींना खोपोली पालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग येथून लग्नसोहळा आटोपून हे वर्हाड खासगी बसने शहापूर, वाशिंद येथे परतत होते. या वेळी द्रुतगती मार्गावरील आडोशी उतारावर या बसला पाठीमागून कंटेनरने धडक बसली. बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते. जोरदार ठोकर लागल्यामुळे बसचा चालक संकेत सावंत बसमधून बाहेर फेकला गेला व कंटेनरखाली आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती होताच द्रुतगती मार्गावरील आपत्कालीन यंत्रणा, खोपोली पोलिस तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय असलेल्या टीमच्या सदस्यांनी तातडीने मदतकार्य करून जखमींना बसमधून बाहेर काढून उपचारासाठी खोपोली व एमजीएम रुग्णालयात आणले.
मुंबई लेनवर दोन्ही अपघातग्रस्त वाहने आडवी झाल्याने जवळपास एक तास येथील वाहतूक पूर्णपणे विस्कळित झाली होती. मदतकार्य पार पडल्यावर आपत्कालीन यंत्रणा व वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
जखमींची नावे
मंगल पांगावणे, राजेश होडावडकर, प्रियंका होडावडकर, प्रभाकर ठाकरे, तुषार सावंत, वसंत मुधावाडेकर, रणजित पानगव्हाणे, स्वरा निवेकर, प्रणाली प्रकाश परुळेकर, प्रकाश परुळेकर, पत्रिका ओतूरकर, आकाश दिलीप चौधरी, ताराबाई शांताराम ठाकरे, श्रीशा निवेकर, सर्व रा.अंबरनाथ व नवी मुंबई.