| मुंबई | प्रतिनिधी |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत आमच्या बाजूनेच निर्णय लागेल. निवडणूक आयोगाने दबावाखाली काम केले, तर मात्र निर्णय वेगळा लागू शकतो. माझ्याबाबतीत तसाच अन्याय झाला. विदर्भातील विरोधी पक्षाच्या नेत्यामुळे मला 14 महिने जेलमध्ये राहावे लागले, अशी खंत राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी व्यक्त केली.
अनिल देशमुख यांचा रोख देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता का. असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण अँटिलिया प्रकरणात फडणवीस विरोधी पक्षनेते होते आणि त्यांनीच जोरदारपणे हे प्रकरण सभागृहात लावून धरलं होतं.
मी जेव्हा गृहमंत्री होतो त्यावेळेला परमवीर सिंह आयुक्त होते. मुकेश अंबानींच्या घरासमोरील गाडीत स्फोटकं ठेवली आणि त्यानंतर गाडीच्या मालकाची हत्या करण्यात आली. परमवीर सिंह आणि वाझे यांचा त्याच्यात हात होता. गृहमंत्री असल्यामुळे मी त्यांची बदली करुन त्यांना निलंबित केलं, असेही देशमुख म्हणाले. त्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्याने परमवीर सिंह यांना हाताशी धरुन माझ्यावर आरोप करायला सुरुवात केली. उच्च न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर त्यात तथ्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
आरोप करणारे परमवीर सिंह यांना न्यायालयाने अनेकदा बोलावलं होतं. सहा समन्स काढूनही ते हजर झाले नाहीत. शेवटी त्यांचं पकड वॉरंट काढलं. मग कुठे परमवीर सिंहांनी कोर्टात शपथपत्र देत माझ्याकडे पुरावे नाहीत आणि जे आरोप केले ते ऐकीव माहितीवर होते, असे म्हटले. परंतु त्यामुळे 14 महिने मला तुरुंगात राहावे लागले, अशी खंत अनिल देशमुख यांनी बोलून दाखवली.







