मी कोण आहे हे अज्ञान दूर करायला हवे-शिवराम महाराज

| नेरळ | वार्ताहर |

माणुसकीचा धर्म हा महत्वाचा आहे. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने प्रत्येकानेे माणुसकीची माळ जोडली, तर त्यातून माणुसकी निर्माण होईल, असे प्रतिपादन शिवराम महाराज तुपे यांनी केले.
नेरळ येथील नेरळ वारकरी संप्रदाय मंडळातर्फे साडे तीन दिवसांच्या अखंड हरिनाम दीपोत्सव सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. नेरळ येथील हनुमान मंदिरात मान्यवरांचे हस्ते दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खोपोली येथील कीर्तनकार द्यानेश्वर महाराज शिंदे तसेच शिवराम महाराज तुपे, स्थानिक माजी सरपंच सावळाराम जाधव, नागो गवळी, भरत भगत, अंकुश दाभने, उर्मिला हजार, तात्या पाटील, बंडू क्षीरसागर आदींसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी दीप प्रज्वलित करण्यात आल्यानंतर महिला भजन गायकांनी दीपआरती घेतली. त्यावेळी मार्गदर्शन करताना शिवराम महाराज तुपे यांनी मी कोण आहे, असा प्रश्न करीत मी कोणीतरी आहे हे आपले अज्ञान आहे. त्यामुळे आपले अज्ञान दूर करण्यासाठी दीपोत्सव अत्यंत महात्वाचा आहे. त्यानुसार आपण आज दीपोत्सव साजरा करून अंधार दूर केला आहे. एक दीप माळ आपल्या सर्वांनी तयार केली आहे. त्यामुळे दीपोत्सव हा आपल्या सर्वांच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावत असून त्या दीपमाळे सारखे सर्वांनी आपल हेवेदावे बाजूला ठेवून माणुसकीचा धर्म पाळावा, असे आवाहन केले.
त्यानंतर भरत भगत आणि सावळाराम जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. दीपोत्सव आधी नेरळ आणि परिसर वारकरी मंडळाच्या वतीने गाव प्रदक्षिणा पायी दिंडी काढून करण्यात आली. हनुमान मंदिर येथून निघालेली पायी दिंडी माथेरान नेरळ रस्त्याने रेल्वे स्टेशनमार्गे खांडा येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात पोहचली. तेथून कल्याण कर्जत रस्त्याने मोहाचीवाडी येथील श्री साईबाबा संस्थानामध्ये पोहचली. तेथून जिजामाता भोसले तलाव येथून छत्रपती शिवाजी महाराज मैदान अशी हनुमान मदिरात पोहचली.या गाव प्रदक्षिणेमध्ये मोठया संख्येने वारकरी महिला देखील सहभागी झाले होते.

Exit mobile version