खोपोली | संतोषी म्हात्रे |
खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी विद्यार्थी संजय महाडिक यांची उपसंचालक क्रीडा संचालनालय मुंबई या पदावर नियुक्ती झाल्या कारणे त्यांचा सत्कार समारंभ जनता विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यांच्यासोबत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये शरीरसौष्ठव स्पर्धेत मानांकन प्राप्त केलेल्या प्रतीक मोहिते यांचे देखील कौतुक केले गेले.
दिनांक 1 ऑक्टोंबर रोजी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने संजय महाडिक आणि प्रतीक मोहिते या दोन माजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील, खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, उपाध्यक्ष संजय पाटील कार्यवाह किशोर पाटील, माजी अध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर यांच्या हस्ते दोन्ही गौरव मूर्तीना सन्मानित केले गेले.
यावेळी आमदार बाळाराम पाटील यांनी सर्वसामान्य कुटुंबातल्या संजय महाडिक यांनी कुस्ती या खेळाचा छंद जोपासण्यासाठी अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करून शालेय आणि महाविद्यालयीन काळात सुवर्ण कामगिरी केली, त्यानंतर उच्च शिक्षण घेत मजल दर मजल करत उपसंचालक पदापर्यंत केलेल्या यशस्वी प्रवासाचे कौतुक केले. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षी या संस्थेत शिकणारे विद्यार्थी ऑलिंपिक सारख्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याइतपत प्रशिक्षित करण्याची जबाबदारी सर्वांनी पार पाडावी असा मनोदय यावेळी त्यांनी व्यक्त केला. त्याच सोबत निवृत्तीनंतर संजय महाडिक यांनी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ तसेच कर्नाळा स्पोर्टस् अकॅडमी मध्ये खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे कर्तव्य बजावावे अशी विनंती केली. आपल्या अपंगत्वावर मात करत शरीर सौष्ठव या क्रीडा प्रकारात जगाने दखल घ्यावी इतपत मजल मारणाऱ्या प्रतीक मोहिते याचे कौतुक करत त्याला मिळालेल्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या मानांकनाचा अभिमान वाटतो असे सांगत त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत नीटनेटक्या आणि छोटेखानी समारंभात हा सत्कार आयोजित केला होता. यावेळी संस्थेचे कार्यवाह किशोर पाटील यांनी प्रास्ताविक केले, संस्थेचे माजी अध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर आणि नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
सत्कार समारंभाला उत्तर देताना भारावून गेलेल्या संजय महाडिक यांनी आपला सत्कार खोपोलीकरानी नव्हे तर आपल्या कुटुंबीयांनी केला, मित्रांनी केला, गुरुजनांनी केला त्यामुळे आपण भारावून गेल्याचे सांगितले. आपला खडतर असा जीवन प्रवास कसा घडला याबाबत अत्यंत भावनिक होत सर्व लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला. स्वर्गीय भाऊ कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली, गुरुजनांच्या सहकार्याने आपण या पदापर्यंत पोचलो याची जाणीव मनात ठेवूनच मी काम करतोय आणि निवृत्तीनंतर देखील त्याच जाणिवेने काम करे न असा विश्वास व्यक्त केला.
या सत्कार समारंभात खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि पत्रकारांच्या सोबत अनेक मान्यवर उपस्थित होते.