प्रशिक्षण पूर्ण करणार्या 50 महिलांना शिवणयंत्र
। अलिबाग । प्रतिनिधी ।
महिलांनी स्वावलंबी बनून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे, तिच्यातील सुप्तगुणांना वाव मिळावा, यासाठी तिच्या पंखात बळ भरण्याचे काम पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह, शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून होणार आहे.
पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या वेश्वी संकुलात शिवणकला प्रशिक्षण केंद्र लवकरच सुरू होणार आहे. एक महिन्याचे प्रक्षिक्षण पूर्ण करणार्या 50 महिलांनाच शिवणयंत्र मोफत दिले जाणार आहे. मात्र, याकरिता काही नियम व अटी लागू असणार आहेत, असे पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह, शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.
महिला सक्षमीकरण तसेच महिलांची प्रगती होण्याकरिता कौशल्य विकास अंतर्गत टेलरिंग युनिट सुरू करून एका महिन्यात उद्योजिका बनवण्याचा मानस आहे. सर्व महिलांना विनंती आहे, की ज्यांना उपजीविकेचे साधन नाही, ज्यांना टेलरिंग क्षेत्रात आवड आहे, ज्यांना स्वकष्टाने काहीतरी करुन दाखवायची इच्छा आहे, अशा होतकरु महिलांना आम्ही प्रशिक्षण देणार आहोत, असे यावेळी चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.
महागाई एका टोकाला गेली असल्याने कुटुंब चालवणे आता फार कठीण झालेले आहे. या सर्व परिस्थितीत महिलांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. म्हणूनच आम्ही हा कोर्स सुरू करत आहोत आणि महिलांना स्वावलंबी करत आहोत. ज्यांना ज्यांना उद्योजिका बनण्याची इच्छा आहे, त्यांनी या संधीचा उपयोग करून घ्यावा आणि आपला फॉर्म आजच भरून घ्यावा. याकरिता काही नियम व अटी लागू असणार आहेत, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. अधिक माहितीकरिता अमोल नाईक 9881041000 आणि प्रसाद मुंगेकर 8879485796 यांना संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.