मीच पालकमंत्री होईन; गोगावले अजूनही आशावादी

अदिती तटकरे बिनखात्याच्या मंत्री

| रायगड | खास प्रतिनिधी |

आदिती तटकरे यांनी मंत्री पदाची शपथ घेऊन आठ दिवस लोटले आहेत. मात्र अद्यापही त्यांना खाते वाटप करण्यात आलेले नाही. सध्या त्या बिन खात्यांच्याच मंत्री म्हणून मिरवत आहेत. तर, मंत्रिमंडळ विस्तार होऊन आपली रायगडच्या पालकमंत्री पदी वर्णी लागेल याकडे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले डोळे लावून बसल्याचे राजकीय चित्र आहे.

अजित पवारांसमवेत सरकारात सहभागी झालेल्या नऊ जणांना मंत्रीपदी बढती मिळाली आहे. मात्र, त्यांना अद्याप खाते वाटप करण्यात आलेले नाही. आदिती तटकरे यांची मंत्रीपदी वर्णी लागल्याने त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर श्रीवर्धन मतदार संघासह अन्य ठिकाणी झळकले आहेत. बिनखात्याच्या मंत्री म्हणून मिरवत असताना ते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या शुभेच्छा देखील स्वीकारत आहेत.

मागून आलेल्या आदिती तटकरे यांची मंत्रीपदी वर्णी लागणे हे गोगावले यांच्या जिव्हारी लागले आहे. त्याच पालकमंत्री होणार अशी चर्चा असल्याने ते मुंबईतच ठाण मांडून असल्याचे सूत्रांनी सांगितले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सायंकाळी मुंबईमध्ये बैठक होणार आहे. गोगावले यांना मंत्री करावे अशी रायगडमधील शिंदे गटातील आमदारांची इच्छा आहे. गोगावले मंत्री झाले तरी ते पालकमंत्री होणार का, याकडे रायगड मधील जनतेचे लक्ष लागले आहे. आदिती तटकरे यांची पालकमंत्री पदी वर्णी लागावी यासाठी खासदार सुनील तटकरे हे देखील प्रयत्नशील असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Exit mobile version