| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पुढील वर्षी 2024 मध्ये देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून, या निवडणुकीतही भाजपचेच सरकार सत्तेवर येऊन लालकिल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचे भाषण करायला मीच पुन्हा येईन, असे जाहीर वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि.15) केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला लाल किल्ल्यावरुन संबोधित केलं. 15 ऑगस्टच्या निमित्ताने देशाला त्यांचं हे दहावं संबोधन होतं. बिगर काँग्रेसी पंतप्रधानांपैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असे एकमेव पंतप्रधान आहेत ज्यांनी सलग दहावेळा लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या भाषणात दहा वर्षांच्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडला. तसंच काँग्रेसवर कडाडून टीकाही केली.
मी तुमच्यासाठीच जिंकतोय 2014 मध्ये मी तुम्हाला परिवर्तन घडेल असं आश्वासन दिलं होतं. त्यावेळी तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात आणि मला या सर्वोच्च पदावर बसवलं. 2019 मध्ये तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर पुन्हा विश्वास दाखवला आणि आशीर्वाद दिला. आता 2024 साठीही मला आशीर्वाद द्या. पुढच्या 15 ऑगस्टला मी पुन्हा तुमच्यासमोर येईन. मी तुमच्यासाठीच जिंकतो आहे, जिंकेन. मी जे कष्ट उपसतो आहे ते तुमच्यासाठीच आहेत. कारण सगळे भारतीय हे माझं कुटुंब आहेत. मी तुमचं दुःख सहन करु शकत नाही. असं म्हणत मोदींनी पुढच्या टर्ममध्येही आपणच पंतप्रधान असू हा विश्वास व्यक्त केला.
मणिपूरमध्ये शांतता आणणार आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरचाही उल्लेख केला. मणिपूरमध्ये आणि हिंदुस्थानच्या इतरही काही भागात हिंसाचार झाला. आई-बहिणींच्या सन्मानाला धक्का लावण्यात आला. देश मणिपूरच्या पाठिशी आहे. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मणिपूरमधील समस्येवर शांततेतून तोडगा काढणार आहे. मणिपूरमध्ये केंद्र आणि राज्य सरकार शांतता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि करत राहू. असंही मोदींनी म्हटलं आहे.
बँकांपासून ते अंगणवाड्यांपर्यंत असं एकही व्यासपीठ नाही की, ज्यामध्ये महिला योगदान देत नसतील. आता माझं स्वप्न गावांमध्ये 2 कोटी लखपती दीदी बनवण्याचं आहे. त्यासाठी आम्ही एक नवी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये 15 हजार महिला बचत गटांना ड्रोन चालवण्याचं आणि दुरुस्त करण्याचं प्रशिक्षण दिलं जाईल. यामुळे ग्रामीण महिलांचं सक्षमीकरण होईल आणि देशाचं कृषी तंत्रज्ञान क्षेत्र मजबूत होईल.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
मोदींचा अहंकार- काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या वर्षी नक्की ध्वजारोहण करतील पण तो कार्यक्रम त्यांच्या घरी होईल. जे सत्तेवर असतात त्यांना हे वाटतच असतं की आपण पुन्हा निवडून येऊ. पण तुम्ही जिंकणार की हरणार हे सर्वस्वी मतदारांच्या हाती असतं. मतदार तुम्हाला काय कौल देतात? त्यावर सगळं अवलंबून आहे. 2023 च्या 15 ऑगस्टच्या दिवशी हे सांगायचं की पुन्हा येईन यात नरेंद्र मोदींचा अहंकार दिसून येतो. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीही त्यांनी विरोधकांवर टीका केली. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी देश कसा एकसंध ठेवणार? असाही प्रश्न खरगे यांनी विचारला आहे.