मला प्रशिक्षक बनायला आवडेल- गौतम गंभीर

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

मागील काही दिवसांपासून क्रिकेट विश्‍वात एकच चर्चा रंगली आहे ती म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने या पदासाठी अर्ज मागवले आहेत. या पदाच्या शर्यतीत माजी खेळाडू गौतम गंभीर आघाडीवर आहे. आता खुद्द गंभीरने याबद्दल मौन सोडले असून, आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक होण्यापेक्षा कोणता मोठा सन्मान नाही, असे गंभीरने सांगितले.

गंभीर म्हणाला की, तुमच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक होण्यापेक्षा मोठा सन्मान नाही. या पदावर असताना तुम्ही 140 कोटी भारतीयांचे आणि जगभरातील लोकांचेही प्रतिनिधित्व करत असता. जेव्हा तुम्ही भारताचे प्रतिनिधित्व करत असता. तेव्हा यापेक्षा मोठा सन्मान तो काय असू शकतो? पण मी भारताला विश्‍वचषक जिंकण्यासाठी कशी मदत करू शकतो? मला वाटते की भारताला विश्‍वचषक जिंकण्यास मदत करणारे 140 कोटी भारतीय आहेत. जर प्रत्येक भारतीय आमच्यासाठी प्रार्थना करू लागला आणि आम्ही त्यांचे प्रतिनिधित्व करू लागलो तर भारत विश्‍वचषक जिंकेल यात शंका नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे निर्भय असणे गरजेचे आहे. जर तुम्ही मला विचाराल तर होय, मला भारतीय संघाचे प्रशिक्षक बनायला आवडेल.

Exit mobile version