। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारत आयर्लंड दौर्यावर युवा खेळाडूंनी भरलेला संघ पाठविला जाणरा आहे.त्यासाठी विश्वचषक आणि आशिया चषक पाहता हार्दिक पांड्यावरील कामाचा ताण सांभाळल्यामुळे त्याला या दौर्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवला टी20 संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. सूर्यकुमार यादव विंडीजविरुद्धच्या टी20 मालिकेत उपकर्णधारही असणार आहे. सूर्यकुमार यादवलाही यंदाच्या आयपीएलमध्ये कर्णधारपदाची संधी मिळाली होती.
भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. यानंतर दोन्ही संघ 3 एकदिवसीय आणि 5 टी20 सामन्यांमध्ये आमनेसामने येतील. भारताला वेस्ट इंडिजपाठोपाठ आयर्लंडचाही दौरा करायचा आहे. या दौर्यात संघ तीन टी20 सामने खेळणार आहे. टी20 विश्वचषक 2022 पासून हार्दिक पांड्या भारतीय टी20 संघाची जबाबदारी सांभाळत आहे. पण चाहत्यांना आयर्लंड दौर्यावर नवीन कर्णधार पाहायला मिळू शकतो.
मात्र अद्याप काहीही असे काही जरी ठरलेले नसले तरी वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे आणि टी20 सामन्यांनंतर हार्दिकला विचारून यावरही निर्णय घेतला जाईल. हार्दिक वेस्ट इंडिज दौर्यावर मर्यादित षटकांच्या मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावेल तो 18 दिवसांत आठ सामने खेळेल. हार्दिक हा भारतीय एकदिवसीय संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे. संघ व्यवस्थापन आणि निवड समिती त्याच्यासोबत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही.
रोहित-विराटला विश्रांतीच
आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या नावाचा विचार केला जाणार नाही. गेल्या वर्षी झालेल्या आयसीसी टी20 विश्वचषकानंतर टीम इंडियाचा चेहरा पूर्णपणे बदललेला दिसत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी20 विश्वचषक 2022 नंतर एकही टी20 आंतरराष्ट्रीय खेळलेला नाही. टीम इंडिया आणि आयर्लंड यांच्यात 18, 20 आणि 23 ऑगस्ट रोजी टी20 मालिका होणार आहे. त्याचबरोबर जसप्रीत बुमराहचे देखील आयर्लंड दौर्यावर टीम इंडियात दुखापतीनंतर पुनरागमन होऊ शकते.
द्रविड यांना डच्चू
मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि विक्रम राठोड (फलंदाजी प्रशिक्षक), पारस म्हांब्रे (गोलंदाजी प्रशिक्षक) यांनाही आयर्लंड दौर्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते. अशा परिस्थितीत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण हे आयर्लंड दौर्यावर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील.