रानभाज्यांची ओळख आणि स्पर्धा संपन्न

| कर्जत | वार्ताहर |

पावसाळ्यात रानात, माळावर उगवणाऱ्या अत्यंत औषधी रानभाज्यांची ओळख शहरी नागरिकांना व्हावी आणि निसर्गाने भरभरून दिलेल्या या देणगीचा नागरिकांनी उपयोग करून आपले आरोग्य सुधारावे या उद्देशाने कर्जत येथील साकव सामाजिक संस्थेने रानभाज्यांची ओळख आणि स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खालापूर तालुक्यातील बोरगाव परिसरातील चिंचमाळ आदिवासी वाडीतील सत्यसाई मंदिरात हा कार्यक्रम संपन्न झाला. चिंचमाळ वाडीतील सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमात उस्फुर्त सहभाग घेतला.

17 महिला स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. डोंगरावर दुर्गम भागात जाऊन एक एक स्पर्धक महिलेने 10 ते 15 प्रकारच्या प्रकारच्या रानभाज्या खुडून व रांधून आणल्या होत्या. नागलीच्या, तांदळाच्या भाकरी बनवून आणल्या होत्या. चुलीवर पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या या भाजी-भाकरीचा मनमुराद आस्वाद परीक्षकांनी व उपस्थितांनी घेतला. प्रत्येक भाजीचे नांव, त्याचे औषधी गुणधर्म, बनविण्याची पध्दत याबद्दल सर्व स्पर्धक महिलांनी भरभरून माहिती दिली. भारंग, लोथ, कौला, बाफळ, कुर्डू, कडूकंद, तेऱ्याची पात, कोंबडा अशा कित्येक हिरव्या भाज्या यावेळी पाहायला व चाखायला मिळाल्या. सुकी भाजी, थपथपित कालवण, वड्या असे प्रकार या महिलांनी बनवून आणले होते. साकव सामाजिक संस्थेच्या विश्वस्त गौरी कुलकर्णी, जितेंद्र ओसवाल, राहुल वैद्य, मनीषा सुर्वे, स्वाती वैद्य, माधुरी दिघे, पल्लवी दिघे, सी.ए. विशाल मुळे, मधुरा मुळे, भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर, चेंबूर येथील अभियंता समीर कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, साहिल कुलकर्णी आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

Exit mobile version