प्रशांत नाईक, प्रदिप नाईक यांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा
। अलिबाग । प्रतिनिधी ।
वेगवेगळया पर्यटनस्थळी पर्यटक जिल्ह्यामध्ये फिरण्यास येतात. नवनवीन पर्यटन स्थळांसह गडकिल्ले, पुरातन मंदिराची ओळख इमेज कॅलेंडरमार्फत गेल्या सात वर्षापासून होत आहे. सुरु केलेल्या उपक्रमाचे सातत्य राखण्यात आले आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक यांनी शुक्रवारी (दि.03) केले. इमेज कॅलेंडरच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अलिबाग प्रेस असोसिएशनच्या सभागृहात अलिबागमध्ये हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच पिंट्या गायकवाड, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनावडेकर, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सिनिअर मॅनेजर संदीप जगे, पीएनपी एज्युकेशन सोसायटीचे जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक, इमेज कॅलेंडरचे निर्माते रमेश कांबळे, जितू शिगवण, समीर मालोदे, परिक्षक विजय मयेकर, विकास पाटील आदी मान्यवरांसह जिल्ह्यातील पत्रकार, छायाचित्रकार, महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी प्रदिप नाईक म्हणाले की, एखादा उपक्रम सुरु केल्यावर तो टिकवून ठेवणे सोपी गोष्ट नाही. परंतु अलिबागमधील वृत्तपत्रातील छायाचित्रकार रमेश कांबळे, जितू शिगवण व समीर मालोदे या तीन छायाचित्रकारांनी गेल्या सात वर्षापुर्वी सुरु केलेली इमेज कॅलेंडरचे सातत्य राखले आहे. ही प्रथा अशीच चालू ठेवा. यावर्षी पुरातन मंदिरातील विषय या कॅलेंडरमध्ये घेतला आहे. वेगवेगळी उत्कृष्ट अशी छायाचित्रे कॅलेंडरमध्ये प्रकाशित केली आहेत. जिल्ह्यातील असंख्य छायाचित्रकारांनी या उपक्रमात सहभाग घेऊन आपले योगदान दिले आहे.
भविष्यात या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात यावा असे आवाहन यावेळी प्रदिप नाईक यांनी केले. दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक समीर मालोदे तर, सुत्रसंचलन सुयोग आंग्रे यांनी केले. यावेळी अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनावडेकर, उत्कृष्ट छायाचित्रकार प्रफुल्ल पवार आदींनी आपले मत व्यक्त केले.
प्रशांत नाईक यांच्याकडून कौतुक
इमेज कॅलेंडरमध्ये जिल्ह्यातील वेगवेगळ्या पर्यटन स्थळांबरोबरच निसर्ग, गडकिल्ले, तसेच पुरातन मंदिरांची छायाचित्रे आतापर्यंत प्रकाशित करण्यात आली आहे. या छायाचित्रांमुळे नव्या पर्यटनस्थळांची ओळख पर्यटकांना निर्माण होत आहे. यातून पर्यटनवाढीला अधिक चालना देणारा उपक्रम सुरु केल्याने अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्याकडून कौतुक करण्यात आले आहे.
बारा उत्कृष्ट छायाचित्रकारांचा सन्मान
पुरातन मंदिर हा विषय ठेवून जिल्ह्यातील हौशी छायाचित्रकार व व्यवसायिक छायाचित्रकारांना छायाचित्र पाठविण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यातील बारा छायाचित्रांची इमेज कॅलेंडरसाठी निवड करण्यात आली. उत्कृष्ट बारा छायाचित्रकार अलिबागमधील वैभव शिंदे, खंडाळेमधील पंकज गोंधळी, महाडमधील कल्पेश पाटील, अलिबागमधील सचिन आसरानी, पालीमधील नितीन शिर्के, माणगांव तालुक्यातील नांदवीमधील प्रफुल्ल पवार, वरसोली येथील परिणिती कांबळे, महाडमधील प्रितम सकपाळ, पेणमधील समाधान पाटील, खोपोलीमधील अविनाश राऊत, ढवरमधील निलेश पाटील, मुरूड तालुक्यातील एकदरा येथील भारत रांजणकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.